घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक शहरात २० जीवघेणे ब्लॅक स्पॉट्स; सहा महिन्यांत 80 जणांचा बळी

नाशिक शहरात २० जीवघेणे ब्लॅक स्पॉट्स; सहा महिन्यांत 80 जणांचा बळी

Subscribe

नाशिक शहरात लॉकडाऊनकाळात अपघाती मृत्यूंमध्ये घट झाली असली, तरी सहा महिन्यांत ब्लॅक स्पॉटसह चौफुली, वळण रस्त्यांवर २५० हून अधिक अपघात झाले आहेत. शहरातील २० ब्लॅक स्पॉटवर तब्बल ८० हून अधिक नागरिकांचा बळी गेल्याचे नाशिक शहर वाहतूक शाखेच्या आकडेवारीवरुन समोर आले आहे. विशेष म्हणजे, ब्लॅक स्पॉट नसलेल्या आरटीओ सिग्नल, रासबिहारी-मेरी लिंक रोड, अंबड-सातपूर लिंक रोड वारंवार अपघात झाले आहेत. त्यामुळे ब्लॅक स्पॉटमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

नाशिक शहरात कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यासह विनाकारण रस्त्यावर फिरण्यास जिल्हा प्रशासनासह पोलिसांनी मनाई केली आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेत शहरात कडक लॉकडाऊन होते. कोरोनाचा प्रादूर्भाव ओसरल्यानंतर लॉकडाऊन शिथील करण्यात आले. ही संधी साधत अनेक बेशिस्त वाहनचालक भरधाव वेगाने वाहनाने रस्त्यांवरुन ये-जा करु लागले. त्यातून जानेवारी ते जून २०२१ या कालावधीत २० ब्लॅकस्पॉटवर तब्बल २५० हून अधिक अपघात झाले. यामध्ये 70 जीवघेणे अपघात झाले असून, ८० जणांचा बळी गेला. आडगाव पोलीस ठाणे हद्दीत सात, नाशिकरोड आणि सरकारवाडा तीन, पंचवटी, उपनगर, पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी दोन, भद्रकाली व म्हसरुळ प्रत्येकी एक ब्लॅक स्पॉट आहे. सहा महिन्यांमध्ये सर्वात कमी २५ अपघात एप्रिलमध्ये झाले. तर सर्वाधिक अपघात फेब्रुवारीमध्ये
49 झाले आहेत.

- Advertisement -

ब्लॅक स्पॉट निश्चिती अशी

अपघाताच्या अनुषंगाने आरटीओ, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ब्लॅक स्पॉट (अपघातप्रणव क्षेत्र) निश्चित केले जातात. तो परिसर ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित केला जातो. रस्त्यावर ५०० मीटर भागात किमान १० जीवघेणे अपघात होणार्‍या अपघातग्रस्त ठिकाणास ब्लॅक स्पॉट म्हटले जाते. अशी ठिकाणे शोधून त्यावर उपाययोजना कराव्यात, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यानुसार परिवहन, बांधकाम, शहर वाहतूक विभाग, रस्ते विकास महामंडळ यांनी संयुक्त पाहणी करुन अपघातग्रस्तस्थळांची यादी निश्चित केली आहे. या ठिकाणी अपघात होऊ नये, म्हणून उपाययोजना करणे अपेक्षित आहे. मात्र, कागदोपत्री काम करण्यात प्रशासन धन्यता मानत असल्याने अपघात होत आहेत.

रस्ते अपघाताची कारणे

भरधाव वेगाने वाहने चालवणे
मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे
ओव्हरलोड वाहने चालवणे
विनाफिटनेस वाहने चालवणे
रस्ते दुरुस्ती, अरुंद रस्ते
धोकादायक वळण

- Advertisement -

 

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -