राज्यभरात बीए ४-५ प्रकारांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ

कोरोनाचा प्रादुर्भाव मागील अनेक दिवसांपासून सतत वाढत आहे. दररोज कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, राज्यभरात बी ए.५ आणि बी ए. ४ या प्रकारांचे रुग्ण वाढत आहेत.

coronavirus 3

कोरोनाचा प्रादुर्भाव मागील अनेक दिवसांपासून सतत वाढत आहे. दररोज कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, राज्यभरात बी ए.५ आणि बी ए. ४ या प्रकारांचे रुग्ण वाढत आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात आणखी बी ए.५ आणि बी ए. ४ चे २३ रुग्ण आढळले आहेत.

मुंबईतील बीए ५ प्रकारांचे १७, तर बीए ४ प्रकाराचे ६ रुग्ण आढळले आहे. कस्तुरबा प्रयोगशाळेने एकूण ३६४ नमुन्यांचे परीक्षण केले असून, त्यापैकी एक नमुना वगळता सर्व नमुन्यांमध्ये ओमायक्रॉन हा विषाणू आढळून आल्याची माहिती कस्तुरबा रुग्णालयाच्या मध्यवर्ती प्रयोगशाळेने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३६४ पैकी ३२५ नमुन्यांमध्ये बीए २ आणि बीए २.३८ हे प्रकार सर्वाधिक प्रमाणात आढळून आले आहेत. हे सर्व नमुने १ ते १८ जून या कालावधीतील आहेत. या २३ रुग्णांमध्ये ० ते १८ वर्षांतील १, १९ ते २५ वर्षांतील २, २६ ते ५० वर्षांतील ९ तर ५० वर्षापेक्षा अधिक असलेल्या रुग्णांची संख्या ११ आहे.

यामध्ये ११ पुरुषांचा व १२ स्त्रियांचा समावेश आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या ४९ झाली आहे. यापैकी पुण्यात १५, मुंबईत २८, नागपूर येथे ४, तर ठाण्यात दोन रुग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्रात १७२८ रुग्ण आणि ४ मृत्यू यांची नोंद

महाराष्ट्रात १७२८ रुग्ण आणि ४ मृत्यू यांची नोंद झाली तर २७०८ जण बरे झाले. राज्यात २४३३३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ७९ लाख ५६ हजार १७३ कोरोना रुग्णांपैकी ७७ लाख ८३ हजार ९४० बरे झाले.

राज्यात कोरोनामुळे १ लाख ४७ हजार ९०० जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ८ कोटी १८ लाख १३ हजार २४८ कोरोना चाचण्यांपैकी ७९ लाख ५६ हजार १७३ पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८५ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ९.७२ टक्के, रिकव्हरी रेट ९७.८४ टक्के आहे.


हेही वाचा – …तर स्वतःच्या बापाच्या नावानं मतं मागा, उद्धव ठाकरेंचा बंडखोरांवर हल्लाबोल