घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात सात महिन्यात २३ वाघांचा मृत्यू

महाराष्ट्रात सात महिन्यात २३ वाघांचा मृत्यू

Subscribe

विधानसभेत लेखी उत्तरात माहिती

देशात जानेवारी ते जुलै २०२१ या कालवधीत देशात ८६ वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. तर याच कालावधीत महाराष्ट्रात विविध कारणांमुळे २३ वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात देण्यात आली.

राज्यातील वाघांच्या मृत्युच्या संदर्भात अशोक पवार आणि अन्य सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावतीने लेखी उत्तरात याविषयी माहिती देण्यात आली आहे. जानेवारी ते जुलै २०२१ या कालावधीत नैसर्गिक कारणांमुळे १५, रेल्वे अपघातात एक, विषप्रयोगामुळे चार विद्युत प्रवाहामुळे एक आणि शिकारीमुळे दोन अशा २३ वाघांचा मृत्यू झाला असून यामध्ये १५ वयस्क आणि ८ बछड्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

उमरखेड-पवनी कर्‍हांडला अभयारण्यात एक प्रौढ वाघ आणि तीन बछड्यांचा विषबाधेने मृत्यू झाला. या प्रकरणी चौकशी करण्यात आली. त्यात गाईच्या मालकाने विषप्रयोग करून वाघाला मारल्याचे कबूल केले आहे. पांढरकडा वन विभागातील मारेगाव वनक्षेत्रात झालेल्या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. वाघांच्या मृत्यू प्रकरणी व्याघ्र प्रकल्पात सायबर सेल तयार करण्यात आला आहे. राज्यात शिकारीच्या घटना घडल्यास सायबर डाटा कक्षाच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यात येतो. वाघांच्या शिकारींना आळा घालण्यासाठी वन्यप्राण्यांचा मागोवा घेण्यात येते. कॅमेरा ट्रॅप लावण्यात येतो. एसटीपीएफ पथकाद्वारे गस्त घालण्यात येते, असे लेखी उत्तरात म्हटले आहे

वाघांच्या हल्ल्यात ३९ मृत्यू
राज्यात जानेवारी ते ३० सप्टेंबर २०२१ या काळात मानव वन्यप्राण्यांच्या संघर्षात ६५ व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यापैकी ३९ व्यक्तींचा मृत्यू वाघांच्या हल्ल्यात झाल्याची माहिती लेखी उत्तरात देण्यात आली. या संदर्भात अमित साटम, अजय चौधरी आणि अन्य सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. जानेवारी २०२० ते सप्टेंबर २०२० या कालावधीत वाघांच्या हल्ल्यात ३१, अस्वलांच्या हल्ल्यात ५, रानगवा, निलगाय आणि कोल्ह्यांच्या हल्ल्यात प्रत्येकी दोन आणि इतर प्राण्यांच्या हल्ल्यात एक अशा ६१ व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यापैकी ५० जण विदर्भातील होते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना १५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. मानव- वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असेही उत्तरात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -