घरताज्या घडामोडीपालिकेची सहाय्यक आयुक्तांसाठी जादा दराने नवीन २४ स्कॉर्पिओची खरेदी

पालिकेची सहाय्यक आयुक्तांसाठी जादा दराने नवीन २४ स्कॉर्पिओची खरेदी

Subscribe

मुंबईपालिकेच्या शहर व उपनगरातील २४ साहाय्यक आयुक्तांसाठी पालिका प्रशासन २ कोटी ८३ लाख रुपये खर्चून नवीन स्कॉर्पिओ गाड्यांची खरेदी करणार आहे. मागील वाहन खरेदी दरापेक्षाही १९ हजार रुपये जास्त मोजून या गाड्यांची खरेदी करण्यात येणार आहे. परिणामी पालिकेला किमान साडेचार लाख रुपयांचा आर्थिक फटका बसणार आहे.
त्यामुळे या गाड्यांच्या खरेदीला विरोधी पक्ष, भाजप यांच्याकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीचा आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

मुंबई महापालिकेचा कारभार हा पालिका आयुक्त, चार अतिरिक्त आयुक्त, ७ परिमंडळ उपायुक्त आणि २४ विभागीय सहाय्यक आयुक्त यांच्या माध्यमातून हाताळण्यात येतो. पालिका साहाय्यक आयुक्त यांना प्रत्येक लहान – मोठ्या बाबींकडे जातीने लक्ष द्यावे लागते. मात्र त्यांना विभागीय पालिका कार्यालयातून विभागातील गल्लीबोळात, चौकाचौकात जाणे, भेटी देणे, पाहणी करणे आदी कामांसाठी गाड्यांची आवश्यकता असते. सध्या या साहाय्यक आयुक्तांकडे उपलब्ध असलेल्या गाड्या या जुन्या झाल्या आहेत.

- Advertisement -

या गाड्या ऐनकामांच्या वेळी अचानक तांत्रिक बिघाड होऊन बंद पडतात. त्याचा मनःस्ताप साहाय्यक आयुक्तांना होतो. तसेच, पालिकेशी संबंधित विविध योजना, विकासकामे आदींवर त्याचा कमी – अधिक प्रमाणात परिणाम होतो. त्यामुळे जुन्या गाड्या भंगारात काढून त्या बदल्यात नवीन स्कॉर्पिओ गाड्यांची खरेदि करण्यात येणार आहे.

पालिकेने मागील वेळी या गाड्यांची खरेदी करताना प्रति स्कॉर्पिओ गाडीमागे ११ लाख ९ हजार रुपये मोजले होते ; मात्र आता नवीन स्कॉर्पिओ २४ गाड्यांची खरेदी करण्यात येणार आहे. मात्र आता या स्कॉर्पिओ गाड्यांचे दर प्रति गाडी बाजारभाव दराने १३ लाख ७ हजार रुपये एवढी असून शासनमान्य गव्हर्मेंट ई- मार्केट प्लेस (जेम) पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याने पालिकेला या खरेदी प्रक्रियेत १५.२०% सवलत देण्यात येणार असल्याने एक स्कॉर्पिओ गाडी पालिकेला ११ लाख २८ हजार रुपयांत ( वाहतूक खर्च ६ हजार रुपये वगळून) उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पालिकेला मागील गाडी खरेदीच्या तुलनेत या नवीन गाडी खरेदीमध्ये एका गाडीमागे १९ हजार रुपये जादा खर्च येणार आहे. त्यामुळे २४ नवीन स्कॉर्पिओ खरेदीपोटी पालिकेला किमान साडेचार लाख रुपयांचा आर्थिक फटका बसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -