घरमहाराष्ट्रराज्यसभा निवडणुकीत २८५ आमदारांचे मतदान, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी टाकले पहिले मत

राज्यसभा निवडणुकीत २८५ आमदारांचे मतदान, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी टाकले पहिले मत

Subscribe

पिंपरी चिंचवडमधील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे गेल्या दोन महिन्यांपासून आजाराने त्रस्त आहेत. कोमातून बाहेर आल्यानंतर 2 जूनला त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते.  पक्षाचा आदेश  असल्याने अखेर ते मतदानासाठी मुंबईत आले. जगताप आज सकाळी साडेआठच्या सुमारास पिंपरी चिंचवडहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले

शिवसेना आणि भाजप  पहिल्यांदाच आमने -सामने उभे ठाकल्याने प्रचंड चुरस निर्माण झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शुक्रवारी विधानसभेच्या २८७ पैकी २८५ आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे अटकेत असलेल्या मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाची परवानगी न मिळाल्याने मतदान करता आले नाही. त्यामुळे २८५ मतांवर राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान झाले. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्याने या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध विधासभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असे स्वरूप प्राप्त झालेल्या राज्यसभा  निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आज सकाळी ९ वाजता विधानभवनात राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला प्रारंभ झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्वप्रथम मतदान केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी ९ वाजता विधानभवनात दाखल होऊन राष्ट्रवादीच्या मतांचे व्यवस्थापन केले.  त्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी एकामागोमाग एक मतदानात भाग घ्यायला सुरुवात केली. राष्ट्रवादी पाठोपाठ कॉंग्रेसच्या आमदारांनी मतदान केले. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आघाडीचे आमदार विजयाची खुण दाखवत होते.  भाजप आमदारांनी गटागटाने मतदानाचा हक्क बजावला. देवेंद्र फडणवीस हे विधानभवनात बसून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते.]

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दुपारी विधानभवनात दाखल झाले. त्यावेळी शिवसेना आमदारांनी जल्लोष केला. मुख्यमंत्री आल्यानंतर शिवसेना आमदारांनी मतदानात भाग घेतला. छोट्या पक्षांचे मतदान सुरु असताना शेवटपर्यंत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवणारे बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर हे आपल्या सहकारी आमदारांसह विधानभवनात दाखल झाले. मतदान केल्यानंतरही ठाकूर यांनी कुणाला मत दिले याचा खुलासा केला नाही.

आजारी आमदार विधानभवनात दाखल

- Advertisement -

राज्यसभा निवडणुकीत प्रत्येक मत महत्वाचे असल्याने भाजपचे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे रुग्णवाहिकेतून विधानभवनात आले. तर   शिवसेनेचे महेंद्र दळवी हे  वॉकर घेऊन मतदानाला आले होते. शिवसेनेने दळवी यांच्यासाठी रुग्णवाहिकेची सोय केली होती.  भाजपच्या मुक्ता टिळक या कर्करोगाशी झुंज देत आहेत. तब्येत खालावलेली असतानाही त्या  मतदानासाठी आल्या. कार्यकर्ता म्हणून पक्षाचा आदेश पाळणे माझी जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी पुण्यात बोलताना  दिली होती.

पिंपरी चिंचवडमधील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे गेल्या दोन महिन्यांपासून आजाराने त्रस्त आहेत. कोमातून बाहेर आल्यानंतर 2 जूनला त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते.  पक्षाचा आदेश  असल्याने अखेर ते मतदानासाठी मुंबईत आले. जगताप आज सकाळी साडेआठच्या सुमारास पिंपरी चिंचवडहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. भाजपने एअरलिफ्ट करण्याचीही तयारी केली होती. मात्र हवामानात वारंवार बदल होत असल्याने डॉक्टरांनी महामार्गाने जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार लक्ष्मण जगतात रस्तेमार्गाने मुंबईत दाखल झाले.

अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी हे वॉकरच्या सहाय्याने विधानभवनात पोहोचले. काही दिवसांपूर्वीच दळवी यांच्या कंबरेवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यांची प्रकृती अद्यापही पूर्णपणे बरी झालेली नाही. परंतु आमदार महेंद्र दळवी वॉकरच्या साहाय्याने विधानभवनात पोहोचले आणि मतदानाचा हक्क बजावला.

अनिल देशमुख,  नवाब मलिक यांचे मतदान नाही

मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारल्याने माजी  गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीत मतदानापासून वंचित राहावे लागले. मलिक यांच्या बाबतीत मुंबई सत्र न्यायालयाने दिलेला निकाल उच्च न्यायालयाने  कायम ठेवत मलिकांना राज्यसभा निवडणुकीत मतदानासाठी परवानगी नाकारली. त्यानंतर याचिकेतील जामिनाचा मुद्दा काढून केवळ बंदोबस्तात मतदानाची परवानगी देण्याची मागणी करत मलिकांनी पुन्हा नव्याने याचिका केली होती. दुपारच्या सत्रात या याचिकेवर सुनावणी पार पडणार होती. मात्र सुधारीत याचिकेवर सुनावणीसाठी न्यायालयाने  नकार दिल्यामुळे मलिकांना मतदान करता आले नाही. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी अनिल देशमुख यांच्या याचिकांवर सुनावणी करण्यास यापूर्वीच न्यायालयाने नकार दिला होता.]

अपक्ष, घटकपक्षांची नाराजी दूर करण्यास आघाडीला यश!

राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदार आणि लहान पक्षांची नाराजी दूर करण्यास महआविकास आघाडीला अखेर यश मिळाले.बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत. या पक्षाचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी महाविकास आघाडी सरकार बाबत नाराजी व्यक्त केली होती. आमच्या मतदारसंघात विकास कामांसाठी जो पक्ष मदत करेल, त्यांना मत देणार असल्याचे ठाकूर यांनी जाहीर केले होते. भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी ठाकूर यांची  भेट घेत पाठिंब्याची मागणी केली होती. दुसरीकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकूर यांना संपर्क केला होता. आज बविआच्या तिन्ही आमदारांनी मतदान केले.  मात्र मत कुणाला दिले हे सांगण्यास ठाकूर यांनी नकार दिला.

आक्षेपांमुळे मतमोजणी लांबली

मतदानावेळी महिला आणि  बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधी ऐवजी अन्य नेत्यांना मतपत्रिका दाखविल्याचा आक्षेप भाजपने घेतला. निवडणूक प्रक्रियेच्या  तरतुदींचा भंग होत असल्याने  त्यांची मते बाद करण्याची मागणी भाजप आमदार पराग अळवणी यांनी केली.  हा आक्षेप निवडणूक निर्णय  अधिकाऱ्यांनी फेटाळल्यानंतर भाजपने भारत  निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याने मतमोजणी लांबली. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे दोन मतपत्रिका आल्याची तक्रारही भाजप नेत्यांनी केली आहे.भाजपच्या तक्रारीनंतर कॉंग्रेसनेही भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांच्यावर अधिकृत प्रतिनिधीला मतपत्रिका दाखवण्याऐवजी दुसऱ्याला मतपत्रिका दाखवल्याचा आरोप केला. हा वाद दिल्लीत गेल्याने संध्याकाळी पाच वाजता सुरु होणारी मतमोजणीची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत हाती घेण्यात आली नव्हती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -