राज्यात करोनाचा नवा उच्चांक

२४ तासांत २९४० नवे रुग्ण, ६३ मृत्यू

Corona

राज्यात शुक्रवारी २९४० नवे रुग्ण सापडले असून, करोनाबाधित रुग्णांची संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे. तर ६३ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १५१७ झाली आहे.राज्यात सातत्याने दोन हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडत असताना शुक्रवारी तब्बल २९४० रुग्ण सापडल्याने सरकारच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. त्याचप्रमाणे राज्यात ६३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी मुंबईमध्ये २७, पुण्यात ९, जळगावमध्ये ८, सोलापूरात ५, वसई विरारमध्ये ३, औरंगाबाद ३, सातार्‍यात २, मालेगाव १, ठाणे १, कल्याण डोंबिवली १, उल्हासनगर १, पनवेल १ तर नागपूर शहरात १ मृत्यू झाले आहेत. मृतांमध्ये ३७ पुरुष तर २६ महिला आहेत. ६० वर्षे किंवा त्यावरील २८ रुग्ण आहेत तर ३१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६३ रुग्णांपैकी ४६ जणांमध्ये ( ७३ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३,३२,७७७ नमुन्यांपैकी २,८८,१९५ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४४,५८२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या १९४९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १६,१५४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६६.३२ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ४,६९,२७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २८,४३० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत १७५१ नवे रुग्ण, २७ जणांचा मृत्यू
मुंबईत शुक्रवारी १७५१ नवे रुग्ण सापडल्याने करोनाबाधितांची संख्या २७ हजार ६८ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे २७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९०९ वर पोहचला आहे. मुंबईतील करोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम असून शुक्रवारीही मुंबईमध्ये तब्बल १७५१ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील करोनाबाधितांची संख्या २७ हजार ६८ वर पोहचली आहे. १७ मे रोजी निदान झालेल्या २७६ चाचण्यांचा शुक्रवारी पोर्टलवर अपलोड केल्याने त्यांचाही यात समावेश आहे. मुंबईमध्ये २७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ९०९ वर पोचली आहे. मृत्यू झालेल्या २७ जणांमधील २२ जणांना दीर्घकाळ आजार होते.