मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर उलटून भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू

3 killed in gas tanker accident on Mumbai Pune expressway
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर उलटून भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू

रायगडमध्ये रविवारी बस दरीत कोसळल्याने ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सोमवारी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँक उलटून झालेल्या अपघातामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला आहे. रस्त्यावर गँस टँकर उलटल्यामुळे दोन्ही बाजूच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या टँकरला अपघात झाला आहे. टँकरमधील गॅसची गळती झाली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मुंबई-पुणे महामार्गावर गाड्यांची रेलचेल असते. सोमवारचा दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. अग्निशमन दल आणि बचावकार्याचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पुण्यावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रोपोलिन गॅस टँकरला अपघात झाला आहे. गॅस टँकर उलटल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या अपघातामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला आहे. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे टँकर थेट पुणे लेनवर येऊन उलटला आहे. टँकर उलटताना तीन गाड्यांनासुद्धा धडकला आहे. अपघातामध्ये ३ लोकांचा मृत्यू झाला असून टँकरचा चालक गंभीर जखमी झाला आहे.

टँकरच्या चालकावर पुण्यातील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बोरघाट पोलीस यंत्रणा, आय आर बी पेट्रोलिंग, खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. टँकरमधील गॅस लीक न झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर हा टँकर उलटल्यामुळे दोन्ही बाजूच्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. टँकर सरळ करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गॅस लीक झाल्यास परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारीसुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहेत. क्रेनच्या मदतीने टँकर बाजूला करण्यात आला आहे. धीम्या गतीने वाहतूक सुरळीत होण्यासाठी काही तास लागणार असल्याचे समजत आहे.


हेही वाचा : अजित पवारांनी सांताक्रूझ पोलीस कोठडीतील CCTV फुटेज जारी करावं, नवनीत राणांचे आव्हान