मुसळधार पावसात भिंत कोसळून ३ वर्षाच्या चिमुकलीचा अंत

उपचारांसाठी आशियाला रुग्णालयात नेत असतानाच तिने प्राण सोडला.

3 year old girl dies after house wall collapses due to Heavy rain in buldhana
मुसळधार पावसात भिंत कोसळून ३ वर्षाच्या चिमुकलीचा अंत

राज्यात ९ जून ते १२ जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा (Warning of heavy rain)  देण्यात आला आहे. राज्याच्या विविध भागात गेल्या दोन तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरांचे नुकसान झालेय. मुंबईतही घर कोसळून अनेकांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अशीच घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील अंजनी येथे गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसात घराची भिंत कोसळून एका ३ वर्षीय चिमुकल्या मुलीचा दुर्देवी अंत झाला आहेत. इतकेच नाही तर घटनेत आणखी तीन जण गंभीर जखमी  झाल्याचे देखील समोर येत आहे. (3 year old girl dies after house wall collapses due to Heavy rain in buldhana)

दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसात अंजनी येथे राहणाऱ्या मनवर था मस्तान खा पठाण यांच्या घराची भिंती पावसामुळे कोसळली. या भिंतीखाली त्यांची ३ वर्षाची मुलगी आशिया पठाण ही दाबली गेली. भर पावसात चिमुकलीला बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. अथक प्रयत्नानंतर आशियाला बाहेर काढण्यात आले. यात ती गंभीररित्या जखणी झाली होती. उपचारांसाठी आशियाला रुग्णालयात नेत असतानाच तिने प्राण सोडला. आशियासोबतच घरातील तीन व्यक्तीही भिंतीखाली दाबल्या गेल्या. त्यांना देखील गंभीर दुखापत झाली आहे. पावसामुळे पठाण यांच्या घराचे मोठे नुकसान झालेच सोबत त्यांना आपल्या मुलीलाही गमवावे लागले.

गेली दोन दिवस मुंबईतही घरे कोसळून नुकसान झाल्याच्या सलग दोन घटना समोर आल्या. मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात इमारतींचा भाग कोसळून शेजारील घरांतील व्यक्तींचा मृत्यू झाला तर गुरुवारी दहिसर येथे मुसळधार पावसामुळे घरे कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. राज्यात पावसाला सुरुवात होताच मोठ्या नुकसानीला समोरे जावे लागले. पावसाचे पुढील चार महिने कसे असतील असा प्रश्न आता सर्वासमोर आहे.


हेही वाचा – भरधाव कार उलटली, सुदैवाने चालक बचावला