घरमहाराष्ट्रचिखलोली धरणासाठी ३१ कोटींचा निधी मंजूर

चिखलोली धरणासाठी ३१ कोटींचा निधी मंजूर

Subscribe

अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणार्‍या चिखलोली धरणाची उंची वाढवण्याकरता नगरविकास विभागाच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत ३१.१० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे चिखलोली धरणाची उंची वाढवण्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला असून चिखलोली धरणात अतिरिक्त ०.८० दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध होणार आहे.

अंबरनाथ शहराकरता लागू असलेल्या ७७ कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत चिखलोली धरणाची उंची वाढवण्याचे काम अंतर्भूत आहे. त्यानुसार चिखलोली धरणाची उंची अडीच मीटरने वाढवण्यात येणार असून ही उंची वाढवल्याने धरणात अतिरिक्त ०.८० दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध होणार आहे. सध्या अंबनाथकरांना या धरणाच्या माध्यमातून ६ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होत आहे. उंची वाढवण्याच्या कामाकरता आवश्यक असलेले संकल्प चित्र सेंट्रल डिझाईन ऑर्गनायझेशन, नाशिक यांच्याकडून विहित मुदतीत न मिळाल्याने या योजनेमध्ये अंतर्भूत असलेल्या कामांच्या दरामध्ये वाढ झाल्याने आवश्यक निधी उपलब्ध व्हावा, याकरता आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता.

- Advertisement -

हिवाळी अधिवेशनात अंबरनाथ शहराकरता लागू करण्यात आलेल्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामात होत असलेल्या दिरंगाईबाबत उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ पर्यंत योजना पूर्ण करण्याचे तसेच चिखलोली धरणाची उंची वाढवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने फेब्रुवारी, २०१६ मध्ये नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकही घेण्यात आली होती. तर जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या दालनातही संबंधित अधिकार्‍यांसह बैठका घेण्यात आल्या होत्या. धरणाची उंची वाढवण्याच्या कामासाठीच्या निधीला मंगळवार, १ जानेवारी रोजी मंजुरी देण्यात आली असून त्यामुळे उपलब्ध होणार्‍या वाढीव पाणीसाठ्यामुळे नव्याने वाढलेल्या लोकसंख्येची तहान भागवणे शक्य होणार असल्याचे आमदार किणीकर यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -