कारमध्ये लपवलेला ३२ किलोचा गांजा जप्त; पाचजणांना अटक

Ganja

आडगाव पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील धुळे बाजूकडून नाशिककडे येणार्‍या नववा मैल बॉर्डर सिलींग पॉईंटजवळ, आडगाव शिवार येथे कारच्या डिक्कीमध्ये लपवलेला ३२ किलो गांजा जप्त केला. पोलिसांनी कार सोडून पळ काढणार्‍या पाचजणांना पाठलाग करून पडकले असून त्यांच्याकडून गांजा, कार, १६ हजार रूपये, ४ मोबाईल जप्त केले आहेत.

शनिवारी (दि.११) सकाळी ११ वाजेदरम्यान आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख धुळे पासिंग २१२३ क्रमाकांच्या कारवर आप्पांचा आशीर्वाद असा उल्लेख असलेल्या गाडीमध्ये विनापरवाना गांजा असून विक्रीसाठी नाशिकमार्गे जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नववा मैल बॉर्डर सिलींग पॉईंटजवळ नाकाबंदी केली. तितक्यात गाडीच्या वर्णनानुसार धुळे पासिंगची कार आली असता पोलिसांनी कारचालकाला कार थांबवण्यास सांगितले. कार थांबवून कारचालक व इतर चारजण पळू लागले. पोलिसांनी पाठलाग करून कारचालकासह चौघांना पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे रोकड व मोबाईल मिळून आले. त्यानंतर पोलिसांनी कारची तपासणी केली असता कारच्या डिक्कीमध्ये दोन प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये ३२ किलो गांजा आढळून आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. डी. बिडगर करत आहेत.