मुंबईत पावसाळ्यातील दुर्घटनांमध्ये ३३ जणांचा मृत्यू ; तर ६७ जण जखमी

मुंबईत ९ जूनपासून पावसाळा सुरू झाला. त्याबरोबर शहर व उपनगरात दरड, इमारत, घरे, झाडे यांची पडझड, शॉर्टसर्किट, समुद्रात बुडणे आदी विविध दुर्घटनांत ३३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ६७ जण जखमी झाले आहेत. अनेकजण सुदैवाने बचावले आहेत. अद्यापही पावसाळ्याचा अडीच महिन्यांचा कालावधी बाकी असून या कालावधीत आणखीन काही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

मात्र शासकीय, प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांनी दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतल्यास दुर्घटना टाळणे, त्याचा प्रभाव कमी करणे, जीवित व वित्तीय हानी टाळणे शक्य होऊ शकते. तसेच राज्याचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पावसाळ्यात कोणतीही अप्रिय दुर्घटना घडू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे व उपाययोजना करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहेत.

मुंबईत जुन्या, धोकादायक इमारती, घरे कोसळणे, इमारतींचा व घरांचा भाग कोसळण्याच्या एकूण ११४ घटना घडल्या आहेत. त्यामध्ये, २३ जणांचा मृत्यू झाला तर ५१ जण जखमी झाले आहेत.

प्रमुख दुर्घटना – 

१) १४ जून रोजी जुहू चौपाटी येथे समुद्रात बुडून ३ जण मृत

२) १९ जून रोजी चेंबूर वाशी नाका येथे २ जण जखमी

३) २३ जून रोजी चेंबूर येथे गारमेंटचा भाग कोसळून १२ जण जखमी

४) २७ जून रोजी दादर येथे झाड कोसळून २ वाहनांचे नुकसान

५) २८ जून रोजी कुर्ला येथे इमारत दुर्घटनेत १९ जण मृत तर १४ जण जखमी

६) ४ जुलै रोजी कुर्ला, होमगार्ड कार्यलयाजवळ संरक्षक भिंत कोसळून ५ घरांचे नुकसान

७) ५ जुलै रोजी दहिसर येथे खदाणीत बुडून २ जणांचा मृत्यू

८) ६ जुलै रोजी चुनाभट्टी येथे घरांवर दरड कोसळून ३ जण जखमी

१ जून ते ७ जुलै २०२२ कालावधीत घडलेल्या दुर्घटना, मृत्यू व जखमी

प्रकार – दुर्घटना – मृत – जखमी

इमारती, घरे – ११४ – २३ – ५१

दरडी कोसळणे- १३ – ० – ०५

झाडे-फांद्या पडणे -५२७ – ० – ११

समुद्र,नदी,खाडी – ०७ –  ७ – ०

नाल्यात पडणे

शॉक लागणे – १२ – ३ – ०

शॉर्ट सर्किट – ३५४ – ० – ०

एकूण १,०२७ ३३ ६७


हेही वाचा : राज्यात स्वच्छता मोहिमेची व्याप्ती अधिक वाढवावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन