घरमहाराष्ट्रराजकीय भूकंप : एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे ३५ आमदार

राजकीय भूकंप : एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे ३५ आमदार

Subscribe

एकनाथ शिंदे यांनी आणखी पुढे जाऊन काही अन्य निर्णय घेण्यापूर्वी शिवसेनेने त्यांना पक्षाच्या विधिमंडळ गटनेते पदावरून दूर केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी वर्षावर तातडीने शिवसेना आमदारांची बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे विधानसभेतील १६ आमदार उपस्थित होते.

राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीतील मतफुटीचा धक्का कायम असताना शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते,नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्रीच बंडाचे निशाण हाती घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला मोठा हादरा दिला. शिंदे यांनी त्यांना मानणार्‍या ३५ आमदारांचा गट सोबत घेऊन थेट गुजरातमधील सुरत गाठले आणि महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. शिंदेंच्या टोकाच्या निर्णयामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. शिंदेंचेे बंड शमविण्यासाठी सेनेतून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू होते, मात्र या प्रयत्नांना मंगळवारी उशिरापर्यंत यश आले नाही.शिंदेंच्या बंडामुळे राज्यात नव्या पर्यायाची चाचपणी सुरू असून सेेनेने एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवले आहे. शिंदेंच्या शिडात भाजपने हवा भरलेली असून मंगळवारी भूकंपाचे केंद्र सुरत होते तर उशीरा रात्री बंडखोर सेना आमदारांना गोव्यात किंवा आसाममध्ये विशेष विमानाने पाठवण्यात आले.

एकनाथ शिंदे यांनी आणखी पुढे जाऊन काही अन्य निर्णय घेण्यापूर्वी शिवसेनेने त्यांना पक्षाच्या विधिमंडळ गटनेते पदावरून दूर केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी वर्षावर तातडीने शिवसेना आमदारांची बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे विधानसभेतील १६ आमदार उपस्थित होते. या बैठकीत शिंदे यांना गटनेता पदावरून हटवून त्यांच्या जागी शिवडीतील आमदार अजय चौधरी यांची निवड करण्यात आली. तसा प्रस्ताव विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना देण्यात आला.

- Advertisement -

शिवसेनेतून पद्धतशीरपणे डावलले जात असल्याच्या भावनेतून एकनाथ शिंदे हे गेल्या काही महिन्यांपासून नाराज होते. अशातच त्यांच्याकडील नगरविकास खात्यात होत असलेल्या हस्तक्षेपामुळे ते हैराण होते. मुंबई महापालिका, एमएमआरडीए यासारख्या महत्वाच्या संस्थांमधील निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवले जात होते. वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांच्या बदल्यांबाबत शिंदे यांना अंधारात ठेवले जात होते. त्यातूनच शिंदे यांनी बंडाचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. शिवाय आमदारांना मुख्यमंत्र्यांची भेट न मिळणे, आमदारांची मतदारसंघातील कामे न होणे, निधी न मिळणे, शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही सरकारवर राष्ट्रवादीचा वरचष्मा असणे यामुळे शिवसेनेतील आमदार नाराज होते. या नाराज आमदारांचे नेतृत्व करून एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरे यांच्या हाती असताना शिवसेनेत झालेले हे पहिले बंड आहे.

सोमवारी विधानभवनात विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरू असताना एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी मुंबईतून काढता पाय घेत थेट सूरत गाठले. शिंदे यांच्या गोटात सुरू असलेल्या हालचालींची कोणतीही कूणकूण खुद्द उद्धव ठाकरे यांना नव्हती. रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांच्यसह शिवसेनेचे अनेक आमदार नॉट रिचेबल असल्याचे शिवसेनेत प्रचंड खळबळ उडाली. मंगळवारी सकाळपासून शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचे बंडाचे वृत्त वार्‍यासारखे राज्यभर पसरल्यानंतर शिवसैनिकांमध्ये संताप निर्माण झाला होता.

- Advertisement -

मिलींद नार्वेकर-रविंद्र फाटक सुरत रिटर्न, मुख्यमंत्री आणि शिंदे यांच्यात चर्चा

एकनाथ शिंदेंचे बंड मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने पावले उचलत मंगळवारी सकाळी वर्षावर शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक घेतली. या बैठकीनंतर शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी ठाकरे यांनी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि आमदार रवींद्र फाटक यांना सुरतला पाठवले. शिंदे यांनी या दोघांशी बंद दरवाजाआड चर्चा केली. यावेळी नार्वेकर आणि फाटक यांनी उद्धव ठाकरे यांचा निरोप शिंदे यांना दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे यांची फोनवरून चर्चा करताना मी पक्षविरोधी कोणतेही कार्य केलेले नाही, शिस्त मोडलेली नाही. कुठल्याही पेपरवर सही केलेली नाही.तरी मला विधीमंडळ गटनेते पदावरून का काढण्यात आले. असा सवाल शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना केला. मला मंत्रिपद नको, पण काँग्रेस राष्ट्रवादीसोबतचा घरोबा संपवावा लागेल. आणि हिंदुत्वासाठी भाजपसोबत सत्ता स्नापन करावी लागेल, असा प्रस्ताव शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.वर्षावर आघाडीच्या घटक पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची संध्याकाळी बैठक झाली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांना सांगितले. सेनेचे बहुसंख्य आमदार मुख्यमंत्र्यांसोबत असल्याचा दावा थोरातांनी केला.

सेनेत फूट पडणार की शिंदेचे बंड शमणार

पक्षांतर बंदी कायदा लागू असल्याने आमदार,खासदार यांना पक्षांतर करणे तितकेसे सोपे राहिलेले नाही.एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना पक्षांतर बंदी कायद्याच्या बडग्यापासून वाचायचे असेल तर त्यांना शिवसेना विधिमंडळ पक्षात दोन त़तीयांश फूट पाडावी लागेल.याचाच अर्थ त्यांना सोबत ३७ आमदारांचे पाठबळ लागणार आहे. स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी देखील त्यांना हा आकडा गाठणे महत्वाचे आहे. ते हा आकडा गाठणार का यावरच या बंडाचे अस्तित्व ठरणार आहे.दुसर्‍या बाजूला मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी देखील बंडाळी शमविण्यासाठी डॅमेज कंट्रोल सुरू केला आहे. पक्ष तसेच सरकार आणि पर्यायाने आपले मुख्यमंत्रिपद वाचवायचे असेल तर उद्धव ठाकरे यांना कोणत्याही परिस्थितीत शिंदे यांचे बंड मोडून काढावे लागेल.

दोघांचं ठरलं! फडणवीस मुख्यमंत्री, तर शिंदे उपमुख्यमंत्री

 मराठवाडा, कोकण, ठाण्यातील किमान ३० हून अधिक आमदारांसह एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाल्यानंतर ते गुजरातमधील सूरतमध्ये एका हॉटेलमध्ये वास्तव्याला असल्याची माहिती मिळालीय. एकनाथ शिंदे यांच्या या बंडानंतर शिवसेनेच्या पायाखालची जमीनच सरकलीय. शिवसेनेनं तडकाफडकी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेतेपदावरून हटवून शिवसेनेचे आमदार अजय चौधरींना ते बहाल केलंय. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी शिवसेना सोडल्यात जमा असल्याचं सांगितलं जात आहे.

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची संध्याकाळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक होणार असून त्यात ते भाजपसोबत सत्ता स्थापन करणार असल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे त्यांच्या सत्तेचा वाटाही ठरला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय. भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचं जमलं असून आज रात्री किंवा उद्यापर्यंत याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. कारण संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत.

पवार आले मुंबईत

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने दिल्लीत असलेल्या शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका मांडली. त्यानंतर ते विशेष विमानाने मुंबईत दाखल झाले. दरम्यान, शिंदे यांच्या बंडाने आघाडीचे घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला आहे. विधान परिषद निवडणुकीतील पराभवावर चर्चा करण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय निवासस्थानी काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत शिंदे यांच्या बंडाबाबत चर्चा करण्यात आल्याचे समजते.

नाराजीमागचं नेमकं कारण

एकनाथ शिंदे यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले याचीही चर्चा सुरू आहे. शिंदेंकडे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) यासारखी दोन अतिशय महत्वाची खाती होती. मात्र या खात्यात युवासेनेकडून होणारा हस्तक्षेप,मनासारखे काम न करता येणे. खात्यांतर्गत होणार्‍या बदल्यांमध्येही विश्वासात न घेतले जाणे या कारणांमुळे शिंदे नाराज होते.

काय घडलं दिवसभरात

रात्री ८ वाजता – एकनाथ शिंदे नाराज आमदारांसह सुरतसाठी रवाना
रात्री १२.३० – सुप्रिया सुळे-जयंत पाटलांची ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांशी भेट
सकाळी ६.०० -शिंदेंसह नाराज आमदार सुरतच्या ली मेरिडियनमध्ये
११.३० – देवेंद्र फडणवीस यांचा नाशिक दौरा रद्द दिल्लीसाठी रवाना
१२.००-मुख्यमंत्र्यांची वर्षावर बैठक
१२.४५-एकनाथ शिंदेंनी प्रस्ताव दिल्यास स्वीकारू – चंद्रकांत पाटील
१.३० – अमित शाह-नड्डांची तातडीची बैठक, नितीन गडकरी दिल्लीला रवाना
२.३० – संजय कुटे फडणवीसांचा निरोप घेऊन शिंदेंना भेटले
४.४५ – एकनाथ शिंदेशी चर्चा करण्यासाठी मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक मुंबईहून सुरतकडे रवाना
३.५६ – एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधीमंडळ गटनेते पदावरून हकालपट्टी
४ .४५ – एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर,रवींद्र फाटक यांच्यात चचा,मुख्यमंत्र्यांशी एकनाथ शिंदे बोलले
५.०० – दिल्लीतील बैठक संपवून शरद पवार मुंबईला आले, नंतर बैठका सुरू
७.०० -काँंग्रेस, राष्ट्रवादी आणि सेना नेते यांची वर्षावर मुख्यमंत्र्यांशी बैठक
८.०० -सेना नेत्यांचीही वर्षावर बैठक
९.०० -सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादीची बैठक, उशीरापर्यंत खलबतं सुरू

विधानसभेतील सध्याचे पक्षीय बलाबल
भाजप – १०६
शिवसेना – ५६
राष्ट्रवादी – ५३
काँग्रेस – ४४
इतर – २९

=एकूण – २८८

भाजप सरकार शक्यता
भाजप – १०६
शिंदे गट – ३०
अपक्ष – १३
मनसे – ०१

=एकूण – १५०

आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही.
– एकनाथ शिंदे,नगरविकासमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -