आयटीच्या छाप्यात सापडली 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता

जालन्यातील स्टील कारखानदार, कपडे व्यापारी आणि बांधकाम व्यावसायिकांची कार्यालये तसेच घरांवर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली. या कारवाईत थोडेथोडके नव्हे तर तब्बल 390 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता अधिकार्‍यांच्या हाती लागली.

जालन्यातील स्टील कारखानदार, कपडे व्यापारी आणि बांधकाम व्यावसायिकांची कार्यालये तसेच घरांवर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली. या कारवाईत थोडेथोडके नव्हे तर तब्बल 390 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता अधिकार्‍यांच्या हाती लागली. आतापर्यंत केवळ ऐकून माहिती असलेले घबाड म्हणजे नेमके काय हे प्राप्तिकर अधिकार्‍यांना प्रत्यक्ष बघायलाच मिळाले. यामध्ये ५८ कोटी रुपयांची रोख रक्कम, ३२ किलो सोन्याचे दागिने, हिरे असा ऐवज आहे.

एवढेच नाही तर ३०० कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रेदेखील प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्‍यांना सापडली आहेत. १ ते ८ ऑगस्टदरम्यान ही कारवाई सुरू होती. छाप्यात सापडलेल्या नोटा मोजताना अधिकार्‍यांची दमछाक झाली. कारण त्यासाठी त्यांना 13 तास लागले. विशेष म्हणजे ही कारवाई करण्यासाठी प्राप्तिकर विभागाचे अधिकारी वर्‍हाडी म्हणून जालन्यात दाखल झाले होते.

जालन्यामधील 4 स्टील कारखानदार, कपडे व्यापारी आणि बांधकाम व्यावसायिकांकडे अमाप बेहिशेबी मालमत्ता असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली होती. यामध्ये औरंगाबादमधील एका व्यापार्‍याचाही समावेश आहे.

या कारवाईसाठी प्राप्तिकर विभागाने 5 पथके नेमली. मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील प्राप्तिकर विभागाचे २६० अधिकारी-कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. स्थानिक अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या मदतीने १ ते 8ऑगस्टदरम्यान या व्यावसायिकांची कार्यालये आणि घरांवर छापेमारी करण्यात आली. या छाप्याची कुणालाही कुणकुण लागू नये यासासाठी अधिकारी जालन्यात वर्‍हाडी म्हणून दाखल झाले.

120 वाहनांच्या ताफ्यातून अधिकारी जालन्यात धडकले. त्यांच्या वाहनांवर दुल्हन हम ले जायेंगेचे स्टीकर्स लावण्यात आले होते. यामुळे या कारवाईचा कुणालाही थांगपत्ता लागला नाही. अखेर प्राप्तिकर अधिकार्‍यांनी स्वतःच या छाप्याची माहिती दिली. छाप्यात हाती आलेली सर्व मालमत्ता प्राप्तिकर विभागाने जप्त केली असून कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत.

कारवाईचे कारण काय?
जालन्यातील स्टील व भंगार व्यावसायिक, कपडे व्यापारी आणि बांधकाम व्यावसायिक बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट घेत असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या निदर्शनास आले होते. या इनपूट टॅक्स क्रेडिटच्या मदतीने ते कोट्यवधी रुपयांची कर चुकवेगिरी करीत होते.

छाप्यात काय सापडले?
=58 कोटी रोख
=32 किलो सोने-हिर्‍यांचे दागिने
=300 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तांची कागदपत्रे
=नोटा मोजायला लागले 13 तास
=अधिकारी आले वर्‍हाडी बनून