घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदेच्या गुवाहाटी दौऱ्यात 4 मंत्री, 4 आमदार आणि 3 खासदारांचे दर्शनच...

मुख्यमंत्री शिंदेच्या गुवाहाटी दौऱ्यात 4 मंत्री, 4 आमदार आणि 3 खासदारांचे दर्शनच नाही!

Subscribe

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आणि समर्थक आमदारांनी काल गुवाहाटीमध्ये कामाख्या देवीचे दर्शन घेतले. पण यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेनेतील बंडखोरीत त्यांना साथ देणारे 4 मंत्री, 4 आमदार आणि 3 खासदार नव्हते, त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

राज्यात जूनमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हे काही आमदारांसह आधी सुरतला आणि नंतर गुवाहाटीमध्ये मुक्कामाला होते. त्यांच्यासमवेत शिवसेना आणि अपक्ष असे 50 आमदार होते. त्यांच्या या बंडखोरीमुळे राज्यात सत्तांतर झाले. उद्धव ठाकरे सरकार पायउतार होऊन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यानंतर आता कामाख्या देवीचा नवस फेडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जवळपास 150 जणांच्या लवाजम्यासह आसाममध्ये दाखल झाले. तिथे गुवाहाटीला कामाख्या देवीचे दर्शन घेऊन राज्यातील जनतेची सर्व संकटे दूर व्हावीत, असे साकडे त्यांनी देवीला घातले.

- Advertisement -

विशेष म्हणजे, भाजपाच्या मदतीने एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केल्यावर शिवसेनेतील अनेक नेते, खासदार, आमदार शिंदे गटात सामील झाले. पण पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर ज्यांना संधी मिळाली नाही, त्यातील काही जणांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर चार मंत्र्यांसह एकूण 11 जणांचे दर्शन गुवाहाटीमध्ये दुर्लभ झाले.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, पाणीपुरवाठामंत्री गुलाबराव पाटील हे मुख्यमंत्र्यांसोबत दिसले नाहीत. अब्दुल सत्तार यांनी कृषी प्रदर्शन, तानाजी सावंत यांनी आरोग्य शिबिर, तसेच मंत्री गुलाबराव पाटील यांनी दूध संघ निवडणूक आणि शंभूराज देसाई यांनी लग्नकार्याचे कारण देत दिले. तर, वैयक्तिक कारणास्तव आमदार संजय गायकवाड, महेश शिंदे, चंद्रकांत पाटील, अनिल बाबर तसेच खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, श्रीरंग बारणे हे देखील गुवाहाटीला गेले नाहीत. विशेष म्हणजे, मंत्रीपद न मिळाल्याने तसेच भाजपासमर्थक आमदार रवी राणा यांच्या 50 खोक्यांच्या आरोपावरून नाराज असलेल प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी मात्र मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह कामाख्या देवीचे दर्शन घेतले.

- Advertisement -

कोणतीही देवी भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देत नाही – ठाकरे गटाची टीका
महाराष्ट्रातील जनतेची सर्व संकटे दूर व्हावीत, आनंद, सुख-समृद्धी मिळावी, असा नवस कामाख्या देवीच्या चरणी केल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात, पण महाराष्ट्रावरील खरे संकट मुख्यमंत्री व त्यांचा गद्दार गट हेच आहे. कामाख्या देवीस न्याय देवता असेही म्हटले जाते. ‘बळी’ची लाच दिली म्हणून ती खंजीर खुपश्या लोकांना बळ देणार नाही. कोणतीही देवी किंवा देव गद्दार आणि भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देत नाही. त्यामुळे कोप झालाच तर तो शिंदे गटाच्या आमदारांवर होईल. म्हणून धावत पळत हे लोक देवीच्या चरणाशी पोहोचले, अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाने केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -