40 रेडे गुवाहाटीला जातील मी नाही; गुलाबराव पाटलांनी सांगितले कारण

शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.

Gulabrab Patil

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोसबत शिंदे गटातील सर्व मंत्री आणि आमदार गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. राजकीय वर्तुळात सध्या याचीच चर्चा सुरु आहे. शिंदे गटातील सर्व मंत्री आणि आमदार गुवाहाटीला जाणार असले तरीही मंत्री गुलाबराव पाटील हे शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाणार नाहीत. जिल्हा दूध संघाची निवडणूक असल्याने आपण गुवाहाटीला जाणार नाही असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान त्यांनी यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना देखील उपहासाने टोला लगावला आहे. पहिल्यांदा जेव्हा आमदार गुवाहाटीला गेले होते तेव्हा संजय राऊत यांनी 50 रेड्यांचा देवीला बळी देणार असे म्हटले होते. यावरून टोला लगावताना कामाख्या देवीला 40 रेडे जाणार आहेत असे गुलाबराव पाटील म्हणाले.

गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणले?
जिल्हा दूध संघाची निवडणूक आहे, त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. निवडणुकीमुळे मला गुवाहाटीला जाणे शक्य नाही. मी जरी जाणार नसलो तरी आमचे बाकीचे सर्व आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला जाणार आहेत. शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिंदे गटाच्या सर्व आमदारांना घेऊन कामख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहेत. यावर मुख्यमंत्री यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही 50 लोक गुवाहाटीला जाणार आहोत. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलावले आहे. आम्ही तिथे जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेऊन आर्शीवाद घेणार आहोत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्याच सोबत आम्ही कोणतेही काम लपून, छपून करत नाही तर उघडपणे करतो असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.


हे ही वाचा – राज ठाकरे आठ दिवस कोकण-कोल्हापूरच्या दौऱ्यावर; निवडणुकांसाठी पक्षबांधणीला सुरुवात