घरCORONA UPDATEकापडी मास्क लावला तरीही कोरोनाचा ४० टक्के धोका

कापडी मास्क लावला तरीही कोरोनाचा ४० टक्के धोका

Subscribe

कोरोना भारतात दाखल होऊन वर्ष उलटले असले तरीही संसर्ग रोखण्यासाठी नेमका कोणता मास्क लावावा आणि तो कशापद्धतीने हाताळावा, याची ७० टक्के व्यक्तींना माहितीच नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. विशेष म्हणजे ज्यांना अचूक माहिती आहे तेदेखील याबाबत फारसे गंभीर नसल्याचे चित्र आहे. रुमाल किंवा कापडी मास्क खरोखर संसर्ग रोखू शकतो का, याबाबत आजही लोकांमध्ये संभ्रम आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते कापडी मास्कपेक्षा सर्जिकल किंवा एन-95 मास्क हाच सर्वाधिक संरक्षण देऊ शकतो. आजच्या या भागात मास्क खरोखर किती प्रभावी ठरतो, तो कोणत्या प्रकारचा असावा, त्याची हाताळणी कशी करावी हे जाणून घेणार आहोत.

हॉस्पिटलशी संबंधित व्यक्ती वगळता अन्य सर्वच लोक कापडी मास्क वापरत असल्याचे चित्र आहे. मास्क विकत घेण्यापूर्वी तो खरोखर किती सुरक्षित आहे, त्यात किती आणि कोणते लेअर आहेत हे पाहण्याऐवजी आपल्याकडे त्याची डिझाईन, इलॅस्टिक पाहिले जाते. एकच मास्क दिवसभर वापरला जातो. त्याची हाताळणीदेखील अत्यंत असुरक्षित पद्धतीने होत असले आणि नेमक्या याच चुका कोरोना विषाणूंच्या पथ्यावर पडतात. त्यामुळेच सातत्याने मास्क लावूनदेखील केवळ चुकीच्या हाताळणीमुळे अनेक व्यक्ती कोरोनाबाधित झाल्या आहेत.

कापडी मास्क हा स्वस्त, पुनर्वापर करण्यासारखा आणि लगेचच उपलब्ध होत असल्याने त्याचा सर्वाधिक वापर होतो आहे. मात्र, हा मास्क केवळ ५० किंवा फारतर ६५ टक्क्यांपर्यंतच सुरक्षितता देतो. अनेक व्यक्ती चेहर्‍याला रुमाल बांधतात. हा रुमालही ५० टक्क्यांपर्यंत सुरक्षित आहे. त्यामुळे उपलब्ध साधनांचा वापर अचूक पद्धतीने करण्याची गरज आहे.

- Advertisement -

एन-95 सर्वात सुरक्षित

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा जे व्यक्ती कोरोनाबाधितांच्या सतत संपर्कात असतात ते प्राधान्याने एन-95 प्रकारचा मास्क वापरतात. एन-95 म्हणजे हा मास्क लावल्यानंतर त्यातील ९५ टक्के अनावश्यक घटक फिल्टर करत असतो. अर्थात 0.1 ते 0.3 मायक्रॉनपर्यंतचे हवेतील सूक्ष्म कण किंवा विषाणूंना रोखण्याची क्षमता या मास्कमध्ये असते. मात्र, दोन बाबी या महत्त्वाच्या ठरतात, त्या म्हणजे हा मास्क लावल्यानंतर त्याच्या बाजूने कुठूनही हवा आत जाण्यास जागा नको (लिकेज) आणि हा मास्क ओला नको. ओला झाला की तो निरुपयोगी ठरतो.

सर्जिकल मास्क देता ८५ टक्क्यांपर्यंत सुरक्षा

सर्जिकल मास्क हा 85 टक्क्यांपर्यंत सुरक्षितता देतो. यात तीन लेअर असतात. बाह्य आवरण जलरोधक आणि आतील दोन्ही भाग हे फिल्टरचे काम करतात. हा मास्क ३ ते ५ रुपयांपर्यंत मिळत असल्याने बहुतांश व्यक्ती याचा वापर करतात. विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात अधिक वापर होतो. एकदा वापरल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी लागते. त्यामुळे त्यापासून संसर्गाचा धोकाही कमी असतो.

मास्क वापरताना ही घ्या काळजी

  • मास्क स्वतंत्र अशा कोरड्या आणि स्वच्छ ठिकाणी ठेवा
  • मास्क लावण्याआधी हात पूर्णपणे सॅनिटाइज करा
  • मास्क लावल्यानंतर कोणत्याही कारणासाठी तो बाजूला काढायचा असेल तर आधी हात मनगटापासून व्यवस्थित सॅनिटाईज करा. तो एका बाजूने अलगद बाजूला काढा. त्याच्या आतल्या भागाचा कोणत्याही ठिकाणी स्पर्श होणार नाही, अशा पद्धतीने तो ठेवा. हात सॅनिटाईज करुनच चेहर्‍याला स्पर्श करा. n मास्क काढल्यानंतर हातांचा अन्य वस्तूंशी संपर्क आला असेल तर हात सॅनिटाइज करुनच मास्क लावावा
  • अनेकांना मास्क नाकाखाली ठेवण्याची सवय असते. किंवा नाकाला खाज आली किंवा पाणी प्यायचे असेल तर अशावेळी चटकन मास्क खाली सरकवतात. ही सवय घातक ठरते.

एन-95 मास्क सर्वाधिक सुरक्षित असला तरीही त्याची किंमत अधिक आहे. त्यामुळे त्याचा वापर व्यापक स्तरावर शक्य नाही. मात्र, सर्जिकल मास्क हे तुलनेने स्वस्त असल्याने ते अधिक सुरक्षित आहेत. मास्क आपल्याला संरक्षण देत असले तरीही, त्यांची हाताळणी हीदेखील सुरक्षितपणे केली पाहिजे.
– डॉ. समीर चंद्रात्रे, सहसचिव, आयएमए, महाराष्ट्र

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -