घरमहाराष्ट्रऑक्सिजन, व्हेंटिलेटरअभावी जीव जात असताना अकोल्यात ४० व्हेंटिलेटर पडून

ऑक्सिजन, व्हेंटिलेटरअभावी जीव जात असताना अकोल्यात ४० व्हेंटिलेटर पडून

Subscribe

राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून विदर्भात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. दरम्यान अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अभावी कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र असे असतानाही नागपूरनंतर सर्वाधिक आयसीयू युनिट असलेल्या अकोल्यात ४० व्हेंटिलेंटर मनुष्यबळाअभावी पडून असल्याची समोर येत आहे. अकोल्यात गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड्सच्या अपुऱ्या सेवा सुविधांमुळे कोरोनाबाधित रुग्णांचा जीव जात आहेत. असे असतानाही अकोल्यातील रुग्णालयात ४० व्हेंटिलेटर पडून असल्याने रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

विदर्भात कोरोना रुग्णसंख्या आरोग्य प्रशासनाच्या आवाक्याबाहेर जात आहे. नागपूरसह संपूर्ण जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. अनेक रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. वेळेवर व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची सुविधा मिळत नसल्याने रुग्णांसह नातेवाईकांना चांगले रुग्णालय शोधण्याची वेळ येत आहे. राज्यातील कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू विदर्भात होत असल्याची आकडेवारी समोर येत आहे. अकोल्याचा विचार केला असता अकोल्यात कोरोना रुग्णांचा उपचारांसाठी रुग्णालयात २०२० मध्ये ३४ व्हेंटिलेटर उपलब्ध होते. परंतु त्याच वर्षात करोनाचा संसर्ग वाढू लागल्याने २९ जून २०२० रोजी केंद्र सरकारने अतिरिक्त ३६ व्हेंटिलेटर अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात उपलब्ध करून दिले. सध्या एकूण ७० व्हेंटिलेटर सर्वोपचार रुग्णालयाकडे उपलब्ध आहेत. मात्र यातील फक्त ३० वेंटिलेटरचाच उपयोग होत असल्याने इतर मनुष्यबळाचा अभाव असल्याने धूळ खात पडून आहेत.

- Advertisement -

दरम्यान नागपूरनंतर विदर्भातील सर्वात मोठे आयसीयू युनीट अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात आहे. यामुळे जिल्ह्यातील खासगी रुग्णालयासह बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, अमरावती व हिंगोली येथील रुग्ण ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर उपचारांसाठी अकोल्यात येतात. सध्याकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयावरील आरोग्यसेवा पुरताना ताण वाढला आहे. तुलनेत मनुष्यबळ अपुरे ठरत असल्याने रुग्णालय प्रशासन हतबल झाले आहे.

जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य सेवा कोलमडून गेली आहे. कारण रुग्णालयात फक्त ५० टक्केच रुग्णसेवक कार्यरत आहेत. डॉक्टर, परिचारिका व मदतनीस यांना दोन शिफ्टमध्ये काम करून कोरोना रुग्णांना सेवा पुरवत आहेत. मागील वर्षी एप्रिलपासून मनुष्यबळ कमी पडत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याकडे एकाही लोकप्रतिनिधीने लक्ष दिले नाही.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -