घरमहाराष्ट्रशिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या 41 मालमत्ता जप्त, आयकर विभागाची मोठी कारवाई

शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या 41 मालमत्ता जप्त, आयकर विभागाची मोठी कारवाई

Subscribe

दोन संशयास्पद नोंदींव्यतिरिक्त आयकर विभाग न्यूजहॉक मल्टी मीडिया कंपनीच्या विविध व्यवहारांची चौकशी करत आहे. सट्टेबाजीशी संबंधित प्रकरणांमध्ये बिमल अग्रवालची पोलीस आणि ईडीने चौकशी केली होती. यशवंत जाधव यांनी बीएमसीच्या 30 कोटी रुपयांच्या विविध कंत्राटांसाठी अग्रवाल यांची मर्जी राखल्याचा आयकर विभागाला संशय आहे.

मुंबईः शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागानं मोठी कारवाई केलीय. आयकर विभागाने जाधव, त्यांचे कुटुंबीय आणि सहकारी यांच्या कथित 41 मालमत्ता जप्त केल्या आहेत. आयकर विभागानं जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये भायखळ्यातील बिलाखडी चेंबर्स इमारतीमधील 31 फ्लॅट, वांद्रे येथे पाच कोटी किमतीचा एक फ्लॅट आणि भायखळ्यातील हॉटेल इम्पेरियल क्राऊनचा समावेश आहे. आयकर कायद्याच्या कलम 132 (9)बी अंतर्गत ही मालमत्ता ताब्यात घेण्यात आलीय.

यशवंत जाधव यांनी न्यूजहॉक मल्टी मीडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि बिमल अग्रवाल यांच्या मालकीच्या कंपनीच्या माध्यमातून या मालमत्ता घेतल्याचं समोर आलंय, तसेच सासू सुनंदा मोहिते यांच्या नावावर हॉटेल आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांच्या नावे इतर मालमत्ता खरेदी केल्यात. 25 फेब्रुवारीला टाकलेल्या छाप्यादरम्यान आयटी विभागाच्या अधिकार्‍यांना जाधव यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या काही संशयास्पद नोंदी असलेली एक डायरी सापडली. अधिकार्‍यांना सापडलेल्या डायरीतील नोंदीनुसार, मातोश्रीवर 50 लाख रुपयांचे घड्याळ आणि 2 कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचा उल्लेख आहे. त्याबद्दल यशवंत जाधव यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, त्यांनी त्यांच्या आईचा उल्लेख ‘मातोश्री’ असा केला आणि आईच्या वाढदिवसाला घड्याळे वाटली. त्याचप्रमाणे त्यांनी आईच्या नावाने 2 कोटी रुपयांच्या भेटवस्तू वाटल्याचा दावा केला. दोन संशयास्पद नोंदींव्यतिरिक्त आयकर विभाग न्यूजहॉक मल्टी मीडिया कंपनीच्या विविध व्यवहारांची चौकशी करत आहे. सट्टेबाजीशी संबंधित प्रकरणांमध्ये बिमल अग्रवालची पोलीस आणि ईडीने चौकशी केली होती. यशवंत जाधव यांनी बीएमसीच्या 30 कोटी रुपयांच्या विविध कंत्राटांसाठी अग्रवाल यांची मर्जी राखल्याचा आयकर विभागाला संशय आहे.

- Advertisement -

भायखळ्याच्या आमदार असलेल्या यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या प्राथमिक तपासात प्रधान डिलर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कोलकाता शेल कंपनीसोबतचे व्यवहार उघडकीस आले होते. प्रधान डीलर्सकडून सुमारे 15 कोटी रुपये मिळाले होते, ज्याची नंतर गुंतवणूक करण्यात आली होती. भायखळ्यातील एक इमारत आहे. जाधव कुटुंबाने प्रधान डिलर्सना पैसे परत केले, त्यांनी ही रक्कम न्यूजहॉक मल्टी मीडियाकडे हस्तांतरित केली. जाधव यांनी न्यूजहॉक मल्टी मीडियाच्या माध्यमातून बिलाकडी चेंबर्समध्ये 31 फ्लॅट खरेदी केल्याचा आरोप आहे. जाधव यांनी इमारतीतील चार ते पाच भाडेकरूंना रोख रक्कम दिली आणि प्रत्येकी 30 ते 35 लाखांपर्यंत पैसे दिले. आणखी 40 मालमत्तांचा तपास सुरू असून, त्यांचा जाधव यांच्याशी संबंध असल्याचा संशय आहे. परदेशात हवाला रॅकेट चालवत असल्याचाही जाधव यांच्यावर आरोप आहे.

इम्पीरियल क्राऊन नावाच्या हॉटेलच्या खरेदीची चौकशीसुद्धा आयकर विभाग करीत आहे. हे हॉटेल देखील न्यूजहॉक मल्टी मीडियाने भाड्याने घेतले होते आणि नंतर बीएमसीकडून क्वारंटाईन सेंटरसाठी करार केला गेला होता. हे हॉटेल कथितरीत्या 1.75 कोटींना विकत घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे, परंतु नंतर एका वर्षात सुमारे 20 कोटींमध्ये विकले गेले. यातही प्रधान डीलर्सची भूमिकाही संशयास्पद आहे. यशवंत जाधव मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष असताना एप्रिल 2018 पासून आजपर्यंत स्थायी समितीने मंजूर केलेल्या कंत्राटांबाबत विभागाने बीएमसीकडून माहिती मागवली आहे. सर्व कंत्राटदारांचे तपशीलही मागवण्यात आले असून, त्यांना बीएमसीने पैसे दिले आहेत. आयकर विभागाला असेही आढळून आले आहे की, बिमल अग्रवाल जाधव यांच्यासोबत इतर काही कंपन्यांमध्ये भागीदार आहेत.

- Advertisement -

अलीकडेच रजिस्ट्रार ऑफ कंपनीज मुंबई यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून प्रधान डिलर्स आणि त्यांच्या संचालकांविरुद्ध तक्रार नोंदवण्यास सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. चौकशीनंतर संबंधित कंपनीविरुद्ध एफआयआर नोंदवला जाऊ शकतो. विशेष म्हणजे आयटी विभागाने या प्रधान डिलर्सच्या संचालकांचे जबाबही नोंदवले आणि ते एंट्री ऑपरेटर उदय शंकर महावर यांच्या नियंत्रणाखाली असलेले डमी संचालक असल्याचे आढळून आले.

जाधव कुटुंबीयांनी प्रधान डीलर्सना परत केलेले पैसे कंत्राटदार बिमल अग्रवाल आणि काहींच्या कंपन्यांमध्ये वळवले असल्याचे आढळले. त्यातील रक्कम इम्पीरियल क्राउन नावाचे हॉटेल खरेदी करण्यासाठी वापरली गेली. प्रधान डीलर्स आणि इतर चार कंपन्यांचा वापर पैशाची अफरातफर करण्यासाठी केला जात होता. पाचपैकी एकाही कंपनीचा प्रत्यक्ष व्यवसाय नव्हता, परंतु निधी एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आला होता. तक्रारीत कंपन्यांच्या संचालकांचीही नावे आहेत. आयटी विभागाने जाधव यांचा पुतण्या विनीत जाधव आणि मेहुणा विलास मोहिते यांना चौकशी संदर्भात समन्स बजावले आहेत, परंतु दोघेही आयकर विभागासमोर हजर होऊ शकले नाहीत.


हेही वाचाः संजय राऊतांनंतर पुढचा नंबर ‘या’ मंत्र्याचा, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -