घरCORONA UPDATEकोरोनामुळे पोलीस उपनिरीक्षकासह दोघांचा मृत्यू; मुंबई पोलीस दलातील ४५ जणांचा मृत्यू

कोरोनामुळे पोलीस उपनिरीक्षकासह दोघांचा मृत्यू; मुंबई पोलीस दलातील ४५ जणांचा मृत्यू

Subscribe

कोरोनामुळे राज्य राखीव दलाच्या पोलीस उपनिरीक्षकासह भोईवाडा पोलीस ठाण्याच्या अन्य एका पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू झाला. सुनिल कृष्णा आढाव असे या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरु होते, उपचारादरम्यान रविवारी रात्री साडेअकरा वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मुंबई पोलीस दलातील पोलिसांची संख्या ४५ झाली आहे. त्यात दोन अधिकार्‍यांसह ४३ पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

सुनिल आढाव हे नायगाव पोलीस वसाहतीत पत्नी अणि मुलीसोबत राहत होते. सध्या ते भोईवाडा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती बिघडली होती, त्यामुळे त्यांना उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथेच त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. २ जुलैला त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

- Advertisement -

त्यानंतर त्यांच्यावर कोव्हीड वॉर्डमध्ये उपचार सुरु होते. रविवारी रात्री त्यांची प्रकृती बिघडली होती, रात्री साडेअकरा वाजता उपचारादरम्यान सुनिल आढाव यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती नंतर त्यांच्या कुटुंबियांसोबत भोईवाडा पोलिसांना देण्यात आली होती. दुसर्‍या घटनेत राज्य राखीव पोलीस दलाच्या एका पोलीस उपनिरीक्षकाचा शनिवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. हा अधिकारी मूळचा गोंदियाचा रहिवाशी असून तिथेच त्याची पत्नी आणि तीन मुले राहतात. सध्या त्यांची नेमणूक मुलुंड येथे होती. कोरोनामुळे त्यांना कल्याण येथे बंदोबस्ताकामी पाठविण्यात आले होते. ४५ दिवसांनंतर ते नवी मुंबईत आले होते, त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नवी मुंबईतील एसआरपीएफच्या कॅम्पसमध्ये क्वारंटाईन करण्यता आले होते. त्यानंतर ते १५ जूनला मुलुंड येथे रुजू झाले होते, त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नसल्याने त्यांना मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथून नंतर त्यांना केईएम रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. तिथे उपचार सुरु असतानाच ४ जुलैला त्यांचे निधन झाले.

राज्य पोलीस दलातील ७० पोलिसांचा मृत्यू

राज्यात गेल्या २४ तासांत दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने राज्य पोलीस दलातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या आता ७० वर पोहचली आहे. तसेच सध्या विविध रुग्णालयात १ हजार ७८ कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरु आहेत. त्यात १२० पोलीस अधिकारी आणि ९५८ पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. गेल्या गेल्या सहा दिवसांत दहा पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलिसांच्या मृत्यूची संख्या आता ७० झाली असून त्यात मुंबई पोलीस दलातील पोलिसांची संख्या ४५ झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -