बांगलादेशात इंधनाच्या किमतीत 50 टक्के वाढ

fuel prices

ढाका-  श्रीलंकेपाठोपाठ आता बांगलादेशालाही आर्थिक संकटाने घेरले आहे. देशाची आर्थिक स्थिती बिघडल्याने बांगलादेशात इतर देशांतून येत असलेला तेल पुरवठाही बाधित झाला आहे. परिणामी एका रात्रीत इंधनाचे दर 50 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. बांगलादेशाच्या इतिहासातील 1971नंतरची ही सर्वात मोठी इंधन दरवाढ आहे. या दरवाढीमुळे बांगलादेशातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे. संतप्त जमावाकडून पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे बांगलादेशातील कायदा-सुव्यवस्था अधिकच बिघडण्याची चिन्हे दिसत आहेत. दुसरीकडे ढासळत्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी बांगलादेशने जागतिक नाणेनिधीकडे 4.5 अब्ज डॉलरचे कर्ज मागितले आहे.

बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका शहरातील मोहम्मदपूर, आगरगाव, मालीबाग आणि इतर भागात पेट्रोल पंपांवर इंधनाच्या दरवाढीनंतर नागरिकांची इंधन भरण्यासाठी एकच गर्दी झाली. इंधन पुरवठा खंडित झाल्यानंतर शनिवारी रात्री 12 वाजेनंतर पेट्रोलचे दर 51.7 टक्क्यांनी वाढले होते.

बांगलादेशच्या ऊर्जा मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार देशात पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 135 टक्क्यांपर्यंत वाढेल, जी आधीच्या 89 टक्क्यांच्या किमतीपेक्षा 51.7 टक्क्यांनी अधिक आहे. बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशनने एक निवेदन जारी करीत तेलाच्या किमतींमुळे फेब्रुवारी ते जुलैदरम्यान कंपनीचे 8014.51 कोटींचे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे.