Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मुंबई सुशोभीकरण प्रकल्पअंतर्गत 50 टक्के कामे पूर्ण, महापालिकेचा दावा

मुंबई सुशोभीकरण प्रकल्पअंतर्गत 50 टक्के कामे पूर्ण, महापालिकेचा दावा

Subscribe

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या 1,729 कोटी रुपयांच्या एकूण 1,077 कामांपैकी 50 टक्के कामे पूर्ण झाली आहेत, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल चहल यांनी, शुक्रवारी पालिका मुख्यालयात मुंबईतील सुशोभीकरणाची कामे, जी -20साठी सुशोभीकरण कामे व पावसाळापूर्व नालेसफाई, रस्ते कामे याबाबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशिष शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त तसेच खातेप्रमुख उपस्थित होते.

- Advertisement -

मुंबई सुशोभीकरण प्रकल्पअंतर्गत 1 हजार 77 कामे
मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाचा आढावा घेताना आयुक्त इकबाल चहल म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील नियमितपणे मुंबई सुशोभीकरण कामांचा आढावा घेत असतात. प्रकल्पात पहिल्या टप्प्यात 500 तर दुसऱ्या टप्प्यात 320 व इतरही अतिरिक्त अशी एकूण 1 हजार 77 कामे हाती घेतली आहेत. यापैकी 613 कामे पूर्ण झाली आहेत; म्हणजे 50 टक्के कामे ठरल्याप्रमाणे मार्चअखेर पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे प्रगतिपथावर असून ती देखील नियोजित वेळापत्रकाप्रमाणे, विशेषतः पावसाळा सुरू होण्याआधी पूर्ण करावीत, विद्युत रोषणाई संबंधी कामे येत्या महिन्यात पूर्ण करावीत, अशी सूचना आयुक्तांनी केली.

जी -20 बैठकीसाठी सुशोभीकरण कामे
मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या जी -20 परिषदेसाठी मुंबई महापालिकेने महानगरातील सुशोभीकरण कामांच्या माध्यमातून एक नवा आदर्श देशातील इतर शहरांसमोर ठेवला आहे. डिसेंबर 2022मध्ये मुंबईत पार पडलेल्या पहिल्या बैठकीवेळी केलेल्या कामांपेक्षा देखील अधिक उत्कृष्ट कामे यावेळी करण्यात आली. महापालिकेने आपली कामगिरी उंचावत केलेल्या कामांमुळे केंद्र आणि राज्य शासनाने देखील मुंबई महानगरपालिकेचे कौतुक केले आहे. त्याबद्दल संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अभिनंदनास पात्र असल्याचे महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी सांगितले.

- Advertisement -

स्वच्छतादूतांची नेमणूक लवकरात लवकर
मुंबई महानगरात सार्वजनिक ठिकाणे, विशेषतः प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्याची सूचना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी केली आहे. संपूर्ण मुंबईत मिळून नवीन प्रसाधनगृहांची उभारणी, आवश्यक तेथील प्रसाधनगृहांची दुरुस्ती व देखभाल, नियमित स्वच्छता याबाबतची प्रगती जाणून घेतल्यानंतर आयुक्त इकबाल चहल म्हणाले की, मुंबईत 5 हजार स्वच्छतादूत नेमण्याच्या दृष्टीने धोरण ठरल्यानंतर आता स्वच्छतादूतांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

मुंबईत विभागनिहाय होणार मातृशक्ती महिला मेळावे
राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून मुंबई शहर व उपनगरांमध्ये सरकार आपल्या द्वारी – मातृशक्ती महिला मेळावे 14 एप्रिलपासून आयोजित होणार आहेत. त्याबाबत राज्याचे महिला व बालकल्याणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नुकतीच पूर्वतयारी बैठक घेतली. प्रत्येक विभाग स्तरावर होणाऱ्या या महिला मेळाव्याच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली जाणार असून महिलांच्या सूचना, तक्रारी ऐकून घेण्यात येतील. यानिमित्ताने महापालिकेच्या वतीने मेळाव्याप्रसंगी येणाऱया महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करावे, तसेच महिला मेळाव्यांच्या समन्वयसाठी प्रत्येक विभाग कार्यालय स्तरावर एका महिला अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी सूचनाही आयुक्तांनी या बैठकीत केली.

- Advertisment -