५३ वर्षीय इसमाचा तरुणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार; मॅट्रिमोनियल साईटवर झाली ओळख

नाशिक : विवाहित असूनही मॅट्रिमोनियल साईटवर अविवाहीत असल्याचे भासवत लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर बलात्कार फसवणूक करणार्‍या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस.खरात यांनी मंगळवारी (दि.२०) 7 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. ही घटना ऑक्टोंबर 2018 मध्ये दिपालीनगर, नाशिक येथे घडली होती. रवीश प्रभाकर दुरगुडे (वय 53 रा. घाटकोपर मुंबई असे या शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी रविश दुरगुडे याने विवाहित असूनदेखील वेडींग साईटवर अविवाहित असल्याचे भासवत फोटो आणि वैयक्तिक माहिती अपलोड केली होती. पीडित तरुणीने त्याच्याशी संपर्क साधला. दोघांचे बोलणे झाल्यानंतर एकमेकांच्या कुटुंबियांची माहिती घेतली. दोघे लग्न करण्यास इच्छुक असल्याने आरोपीने तरुणीच्या मोबाईलवर संपर्क साधत जवळीक निर्माण केली. तिला भेटण्यास नाशिक येथे आला. फिरावयास घेऊन जात तिला लग्नाचे अमिष देत शारिरीक संबध ठेवले. अनेक दिवस होऊन देखील आरोपी लग्न करण्यास विलंब करत असल्याने त्याच्याबद्दल तरुणीने माहिती काढली असता तो विवाहित असल्याचे समोर आले. त्यातून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक पी. यु. शिंदे यांनी तपास करत आरोपीविरोधात सबळ पुरावे गोळा करुन गुन्हा शाबित होण्याच्या दृष्टीकोणातून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.

या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय विशेष पोक्सो न्यायालयात झाली. न्यायालयाने पंच, साक्षीदार, फिर्यादी यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिकारी यांनी सादर केलेल्या परिस्थीतीजन्य पुराव्यास अनुसरुन सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे एस.एस.गोरे यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून एस. सी. भोये, पी. व्ही. पाटील यांनी पाठपुरावा केला.