घरताज्या घडामोडीमुंबईतील ५,८०० कोटींच्या रस्ते कामांची निविदा महापालिकेकडून रद्द

मुंबईतील ५,८०० कोटींच्या रस्ते कामांची निविदा महापालिकेकडून रद्द

Subscribe

मुंबई महापालिकेतील कोरोना विषयक कंत्राटकामे, रस्ते कामे, भूखंड खरेदी आदी कामांबाबत कॅगकडून चौकशी होणार आहे. या वृत्ताने मुंबई महापालिका व सत्ताधारी हादरले आहेत. अशातच मुंबई महापालिकेने मुंबईतील ५,८०० कोटी रुपयांच्या सीसी रोड कामांची निविदा प्रक्रिया अचानकपणे रद्द करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे.
सदर रस्ते कामांच्या निविदा प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद लाभलेला नाही, असे प्रमुख कारण देत पालिकेने ५,८०० कोटींच्या रस्ते कामांची निविदा प्रक्रिया अचानकपणे रद्द केल्याचे मंगळवारी सायंकाळी जाहीर केले. त्यामुळे पालिका वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. तसेच, निविदा प्रक्रिया आणखीन लांबल्यास कामाला विलंबाने सुरुवात होईल व काम पूर्ण करण्याचा कालावधी व कामाचा खर्च वाढत्या महागाईमुळे आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
त्याचप्रमाणे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबी समावेश करुन आणि गुणवत्तेशी तडजोड न करता जलद गतीने कामे होण्यासाठी नव्याने निविदा मागवणार असल्याचेही प्रशासनाने जाहीर केले आहे.

विशेष म्हणजे राज्यात राजकीय भूकंप झाल्यावर नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, मुंबईत खड्डेमुक्त रस्ते होण्यासाठी तब्बल ४०० किमी लांबीचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनविण्याचे आदेश काही महिन्यांपूर्वी पालिका प्रशासनाला दिले होते. त्यासाठी ५,८०० कोटी रुपये खर्चण्यात येणार आहेत, अशी माहिती खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देत मोठा गाजावाजा केला होता. मात्र आता रस्ते कामांच्या निविदा प्रक्रियेला अल्प प्रतिसाद मिळाल्याची कारणे देत सदर निविदा प्रक्रियाच रद्द करण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे. पालिका प्रशासनाने मंगळवारी रस्ते कामांच्या निविदा रद्द केल्याच्या निर्णयाचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ऑगस्ट २०२२ मध्ये निविदा प्रक्रिया सुरु केली होती. या पाच निविदांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याने सदर निविदा रद्द करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. असे असले तरी, या कामांसाठी नव्याने लवकरच निमंत्रित केल्या जातील, त्यापूर्वी निविदांच्या अटी व शर्तींचे पुनर्विलोकन करण्यात येईल, तसेच गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता जलदगतीने कामे करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करणे या दृष्टीने निर्णय घेवून नवीन निविदा मागविणे संयुक्तिक ठरेल, असे महापालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे.

फक्त पाच निविदा प्राप्त

- Advertisement -

मुंबईतील रस्ते सुधारणा व मुंबई महानगर पुढील एक वर्षात खड्डेमुक्त करण्याच्या दृष्‍टीने मुंबई महापालिकेने सुमारे ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी एकूण पाच निविदा २ ऑगस्ट २०२२ रोजी निमंत्रित केल्या होत्या. यामध्ये शहर -१, पूर्व उपनगरे -१ आणि पश्चिम उपनगरे – ३ अशा एकूण पाच निविदांचा समावेश होता. या पाच निविदांमध्ये समाविष्ट असलेल्या कामांसाठी एकूण अंदाजित खर्च ५ हजार ८०६ कोटी रुपये इतका होता.

मोठ्या नामांकीत कंपन्या समाविष्ट होण्यासाठीच जाचक अटीशर्ती

रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता व दर्जा उत्तम राखण्यासाठी या निविदांमध्ये मोठ्या नामांकीत कंपन्या समाविष्ट होण्यासाठी निविदा प्रक्रियेत कठोर अटी व शर्ती समाविष्ट करण्यात आल्या होत्या, अशी कबुलीच पालिका प्रशासनाने दिली आहे.

१) रस्ते कामांत संयुक्‍त भागीदारीला परवानगी नाही.

२) दुस-या कंत्राटदाराकडे कामे हस्‍तांतरणास मनाई

३) राष्‍ट्रीय तसेच राज्‍य महामार्गांचा अनुभव आवश्यक.

४) बळकट निविदा क्षमता.

५) काम पूर्ण झाल्‍यावर ८०% रकमेचे अधिदान, उर्वरित २०% रक्‍कम दोषदायित्‍व कालावधीत अधिदान

६) कामाचा दोषदायित्‍व कालावधी १० वर्षे ठेवण्‍यात आला आहे.

७) अत्‍याधुनिक क्‍यूआरकोड चे छायाचित्र बॅरिकेडवर लावण्‍यात येईल. जेणेकरुन सामान्‍य जनतेला कामासंबंधी माहिती मोबाईलवर उपलब्‍ध होईल.

८) बॅरिकेडवर जीपीएस ट्रॅकर बसवणे.

९) गुणवत्‍तेत दोष आढळल्‍यास जबर दंडाची कारवाई करण्‍यात येईल.

१०) कंत्राटदाराची स्‍वतःची यंत्रसामग्री असणे आवश्‍यक आहे.

११) कंत्राटदाराकडील कामगार कमीत कमी १ वर्षे कंपनीच्‍या पे-रोलवर असणे आवश्‍यक आहे.

१२) सदरच्‍या कामासाठीचे साहित्‍यसामग्री, कंत्राटदाराच्‍या कंपनीने अधिदान करणे.

१३) देखरेखीसाठी सीसीटीव्‍ही कॅमेरे प्रत्‍येक साईटवर बसविणे.

१४) प्रत्‍येक रस्‍त्‍यावर वारंवार चर खोदू नये, यासाठी डक्‍ट बांधणे.

या अटींमुळे सदर निविदांना अत्यल्प प्रतिसाद प्राप्त झाला. त्याचे विवरण पुढीलप्रमाणे आहे.
(क्रम / विभाग / निविदा/ कामाचे नाव / निविदाकारांची संख्या या क्रमाने)

१) शहर / १ / C-309 / १ निविदाकार

२) पूर्व उपनगरे / १ / E-289 / २ निविदाकार

३) पश्चिम उपनगरे/ एकूण ३ निविदा / त्यातः अ) W-414 साठी १ निविदाकार / ब) W-415 साठी २ निविदाकार / W – 421 साठी १ निविदाकार

पालिका जाचक अटीशर्तींचे करणार पुनर्विलोकन

रस्ते कामांबाबत घालण्यात आलेल्या जाचक अटीशर्तींमुळे निविदा प्रक्रियेला अल्प प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे पालिकेने निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता काही कठोर अटी व शर्तींचे पुनर्विलोकन करण्यात येणार असून त्यात गुणवत्तेशी तडजोड न करता बदल करण्याचा मानस पालिकेने व्यक्त केला आहे. तसेच, रस्त्यांची कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रथमच प्रिकास्ट पर्जन्यवाहिन्या व उपयोगिता सेवा वाहिन्यांसाठी भूमिगत प्रिकास्ट डक्ट व प्रिकास्ट मॅनहोल तसेच इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करुन नवीन निविदा तातडीने मागविण्याचे प्रशासनाने ठरविले आहे.

प्रिकास्ट पर्जन्य जलवाहिन्या, प्रिकास्ट डक्ट व प्रिकास्ट मॅनहोल यांचा अंतर्भाव केल्याने कामाची गुणवत्ता सुधारण्यास आणखी मदत होणार आहे. कामासाठी लागणा-या वेळेची अधिक बचत होऊन काम लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होईल. या सर्व कारणांनी नवीन निविदा मागविणे संयुक्तिक ठरणार आहे, असे पालिकेने म्हटले आहे.


हेही वाचा : भारतात 26 लाख व्हॉट्सअॅप अकाऊंट बंद, जाणून घ्या काय आहे हे प्रकरण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -