‘5 जी’ आले, पण अर्थकारण बिघडले; शिवसेनेचे ‘सामना’तून मोदी सरकारवर शरसंधान

मुंबई : देशात ‘5 जी’ सेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन दिवसांपूर्वी सुरू झाली. देशाच्या संपर्क क्षेत्रात क्रांतिकारी ठरणारी ही सेवा आहे. पण ‘5 जी’ डिजिटल क्रांतीची पहाट होत असतानाचे हे चित्र काय सांगते? देशाची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे ढोल बडवणाऱ्या मोदी सरकारचे अर्थकारण पुरते बिघडले आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

मार्च 2022 अखेर देशाच्या डोक्यावर असलेले परकीय कर्ज तब्बल 620 अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. देशाच्या अर्थमंत्र्यांनी यावर बोलायला हवे. पण त्या बोलणार नाहीत. निदान अर्थतज्ञ म्हणवून घेणाऱ्यांनी तरी सत्य समोर आणावे. श्रीलंका, ग्रीस, मालदिव यांसारखी लहान राष्ट्रे परकीय कर्जात व आंतरराष्ट्रीय सावकारी पाशात फसली आहेत. हिंदुस्थान हा मोठा देश आहे. पण शेवटी कर्ज वाढले की त्याचा फटका सामान्य जनतेला बसेल. राज्यकर्त्यांचे व उद्योगपतींचे काय जाते? देशाचे वातावरण बिघडले आहे. उद्योग, व्यापार करणाऱ्यांसाठी वातावरण बरे नाही, असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

खरी समस्या महागाई आणि रोजगाराचीच
डिजिटल भारताचे स्वप्न राजीव गांधींच्या काळात सुरू झाले. अटलबिहारी यांच्या काळात तेव्हाचे दूरसंचार मंत्री प्रमोद महाजन यांनी ते गतिमान केले व आता मोदी युगात ‘5 जी’ सेवेने ही गती रॉकेटच्या वेगाने पुढे जाताना दिसत आहे. 5 जी ही स्वदेशी यंत्रणा आहे. या नव्या स्वदेशी यंत्रणेमुळे नव्या युगाची पहाट झाली आहे. 130 कोटी भारतीयांना ‘5 जी’च्या रूपात एक सुंदर भेटवस्तू मिळाली आहे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यातील मुख्य फायदा असा की, ‘5 जी’मुळे देशात रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. देशातील खरी समस्या महागाई आणि रोजगाराचीच आहे. डिजिटल भारताचे पुढचे पाऊल बेरोजगारीच्या छाताडावर पडले तर आनंदच आहे, असे या अग्रलेखात नमूद केले आहे.

‘5 जी’वर ‘हांजी’ने मात करू नये
मोदी यांना वेगाचे वेड आहे. ते देशाला गतिमान करू इच्छितात. त्यांनी जपानच्या मदतीने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू करण्याचे मनावर घेतले व आसपासच्या भागातील जमिनी या प्रकल्पासाठी ताब्यात घेतल्या. म्हणजे या विकासात शेतकरी व जमीनमालकांचेही योगदान आहे हे लक्षात घेतले पाहिजे. देशात सुरू झालेली ‘5 जी’ सेवा विकासात भर घालणारीच आहे, मात्र गेल्या पाच-सहा वर्षांत देशाच्या राजकारणाचे ‘हांजी हांजी’करण ‘5 जी’च्या वेगाने आधीच सुरू झाले व ते पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेस तडा देणारे आहे. घराणेशाही, वंशवादाच्या राजकारणात ‘हांजी हांजी’ चालते, पण लोकशाहीत ‘5 जी’वर ‘हांजी’ने मात करू नये इतकीच अपेक्षा असते, असा टोला देखील शिवसेनेने लगावला आहे.

देशातील चित्र काय आहे?
मोदी यांनी देशात ‘5 जी’ युग सुरू केले, पण देशाच्या अनेक भागांत आज इस्पितळे नाहीत. शिक्षणाची बोंब आहे. महाराष्ट्रात, मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात आदिवासींना ‘झोळी’ व ‘डोली’च्या माध्यमांतून आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचवावे लागते. गरोदर स्त्रिया त्या झोळीतच अनेकदा बाळंत होतात व त्यात अर्भकांचे मृत्यू होतात. ‘5 जी’ युगातील हे चित्र विदारक आहे. गरीबांना फुकट धान्य दिले जाते, पण हे काही स्वावलंबी भारताचे चित्र नाही. कल्याणकारी राज्याचे मार्मिक वर्णन डॉ. कॉलिन क्लार्क यांनी केले आहे. ते म्हणतात की, ‘एखाद्याने सणाच्या दिवशी लोकांवर भेटवस्तूंचा वर्षाव करावा आणि नंतर काही दिवसांनी त्या भेटवस्तूंची सगळी किंमत आपल्या भरपूर कमिशनसहित संबंधितांकडून वसूल करावी, असे कल्याणकारी राज्याचे स्वरूप असते.’ आपल्या देशात नेमके हेच चित्र दिसत आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

एकनाथ शिंदेंनी सांगितलेले योग्यच!
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व मिंधे गटाचे मुख्य नेते हे पनवेल येथील शाळेत खास उपस्थित राहून ‘5 जी’च्या शुभारंभ कार्यक्रमात सहभागी झाले. पनवेलमधील शाळेत मुख्यमंत्री विद्यार्थी बनले. ते विद्यार्थ्यांबरोबर बाकावर बसले. त्यांनी म्हणे विद्यार्थ्यांना ‘5 जी’चे महत्त्व समजावून सांगितले. ‘5 जी’मुळे इंटरनेटला मिळणाऱ्या वेगाचा फायदा अभ्यासासाठी करा, गेम आणि सिनेमे डाऊनलोड करण्यासाठी नाही, असे मार्गदर्शन मुख्यमंत्र्यांनी केले व ते योग्यच असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.