घरठाणेठाणे जिल्ह्यातील मतदार ६२ लाख १४ हजार

ठाणे जिल्ह्यातील मतदार ६२ लाख १४ हजार

Subscribe

तरुण मतदारांची संख्या ८० हजाराने वाढली, विशेष पुनरिक्षण कार्यक्रमात जिल्ह्याच्या अंतिम मतदार यादी जाहीर

ठाणे । भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये ठाणे जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्येत ७९ हजार ५६२ एवढी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील १८ ते १९ वयोगटात १९ हजार ३९४ नवीन मतदार तर २० ते २९ वयोगटातील ३० हजार ४७१ मतदारांची नव्याने नोंदणी झाली आहे. त्यामुळे एकूण मतदार राजाचा आकडा ६२ लाख १४ हजार ५१७ इतकी झाली आहे.
भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीत मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला होता. त्यानुसार जिल्ह्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनासाठी मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या बैठका घेऊन मतदार नोंदणी करण्यासाठी विविध उपाय योजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी पाठपुरावा करून मतदार नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न केले.

असे आहेत मतदार
प्रारुप मतदार यादीत जिल्ह्यात ३३ लाख २८ हजार ९ पुरुष व २८ लाख ६ हजार ९३ महिला आणि इतर ८५३ असे एकूण ६१ लाख ३४ हजार ९५५ एवढे मतदार होते. अंतिम मतदार यादीत ही संख्या ७९ हजार ५६२ ने वाढून पुरुष ३३ लाख ६७ हजार १२० मतदार, महिला २८ लाख ४० हजार ३१९ आणि १०७८ इतर असे एकूण ६२ लाख १४ हजार ५१७ मतदार झाले आहेत.

- Advertisement -

युवा मतदार
विशेष म्हणजे अंतिम यादीनुसार जिल्ह्यात युवा मतदारांच्या संख्येतही वाढ झाली आहे. ९ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या एकत्रिकृत प्रारुप मतदार यादीत १८ ते १९ वयोगटातील २६ हजार ७०५ मतदार होते. ५ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीत ही संख्या १९ हजार ३९४ ने वाढून ४६ हजार ९९ एवढी झाली आहे. तसेच २० ते २९ वयोगटातील प्रारुप यादीत ९ लाख ९० हजार ९८४ मतदारांची नोंदणी होती. अंतिम यादीत ही संख्या ३० हजार ४७१ ने वाढून १० लाख २१ हजार ४५५ एवढी झाली आहे.

१७ वर्षांवरील १७ हजार ३८८ भावी मतदारांनी केली नोंदणी
मतदार संख्या वाढावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी, १ फेब्रुवारी, १ जुलै व १ ऑक्टोबर या चार अर्हता दिनांक घोषित केल्या आहेत. तसेच विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२३ दरम्यान १७+ भावी मतदारांच्या नाव नोंदणीसाठी विशेष समर्पित सहायक मतदार नोंदणी अधिकारी नेमण्यात आले होते. त्यांच्यामार्फत मोहिम राबवून युवा मतदारांची नोंदणीसाठी शिबिरे आयोजित केली होती. त्यामुळे जिल्ह्यात १७ वर्षे पूर्ण झालेल्या भावी मतदारांच्या संख्येत वाढ झाली असून जिल्ह्यात एकूण १७ हजार ३८८ युवकांनी विधानसभा मतदारसंघ स्तरावर अर्ज केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -