अबब ! जिल्हयात आढळले कोरोनाचे ६४५ रूग्ण

६ जणांचा मृत्यु : रूग्णसंख्येने गाठला ३ हजारांचा टप्पा

covid19

शहरासह जिल्हयात निर्बंध घालूनही कोरोना रूग्णसंख्येत वाढच होतांना दिसत आहेत. शनिवारी एकाच दिवसांत जिल्हयात ६४५ रूग्ण आढळून आले. दिवसभरात ६ बाधितांचा मृत्यु झाला आहे.

राज्यासह नाशिकमध्येही पुन्हा कोरोना संसर्ग वाढत असल्याचे दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून जिल्हयात दररोज साधारपणे दोनशे ते तीनशे रूग्ण आढळून येत होते. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरिस हा आकडा पाचशेच्या घरात गेला. मात्र मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडयात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येते. शनिवारी एकाच दिवसात ६४५ रूग्ण आढळून आले. यात शहरात सर्वाधिक ४०६ तर ग्रामीण भागात १६३ रूग्ण आढळून आले आहेत. ६ फेब्रुवारी रोजी जिल्हयात १११ कोरोना बाधित रूग्ण होते यात वाढ होत आजमितीस जिल्हयात ३ हजार ४३४ वर जाऊन पोहचली आहे. यात दिवसेंदिवस वाढतच होत असल्याचे दिसून येेते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेकडून शहरात निर्बंध लागू करण्यात आले असून विनामास्क फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच विवाह सोहळयांवरही निर्बंध आणण्यात आले आहेत. शहरातील शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरील शाळाही बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात येऊनही रूग्णसंख्या वाढत असल्याने शहरात निर्बंध आणखी कठोर करायचे की काय याबाबत प्रशासनाकडून विचार सुरू असल्याचे समजते.

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख १९ हजार १२६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३ हजार ४३४ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार १२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५४ टक्के असले तरी, सध्या रूग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

आज आढळून आलेले रूग्ण
नाशिक महापालिका ४०६
नाशिक ग्रामीण १६३
मालेगाव महापालिका ५२
जिल्हा २४