मुंबईः ठाकरेंच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झाली असून, या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. काजूबोंडे, मोहफुलांच्या दारूला विदेश मद्याचा दर्जा देणार असल्याचं मंत्रिमंडळात एकमतानं ठरवण्यात आलंय. त्यामुळे गावठी दारूला आता विदेश मद्याचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रो भुयारी मार्ग, काजूबोंडे, मोहफूल मद्य आणि नवी मुंबईतीली तिरुपती देवस्थानास मंदिर उभारण्यास भूखंड देण्याचाही निर्णय घेण्यात आलाय.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
>> जिल्हा वार्षिक योजने(सर्वसाधारण) अंतर्गत शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करून, त्यासाठी किमान ५ टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग)
>> तिरुपती देवस्थानास नवी मुंबई येथे व्यंकटेश्वराचे मंदिर उभारणीसाठी भूखंड प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (नगरविकास विभाग)
>> पुणे महानगर मेट्रो रेल्वे टप्पा-१ची विस्तारीत मार्गिका स्वारगेट ते कात्रज पूर्णत: भुयारी मेट्रो रेल्वे प्रकल्प करण्यास मान्यता देण्यात आलीय. (नगरविकास विभाग)
>> महसूल वाढीसाठी विद्यमान एफएल-२ परवान्यातून अतिउच्च दर्जाची मद्यविक्री परवाना आणि उच्च दर्जाची मद्यविक्री परवाना असे उपवर्ग निर्माण करण्यास मान्यता मिळालीय. (गृह विभाग)
>> काजूबोंडे, मोहफुलेपासून उत्पादित केलेल्या मद्यास विदेशी मद्य, असा दर्जा देण्याचा आणि या पदार्थांसह फळे, फुले यापासून मद्यपार्क उत्पादन आणि त्यातून विदेशी मद्यनिर्मिती करण्यासाठी धोरण ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (गृह विभाग)
>> शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या भागभांडवलाची मर्यादा वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे. (इतर मागास बहुजन कल्याण विभाग)
>> मुंबईतील मौजे मनोरी (ता. बोरिवली) येथील परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रम चॅरिटेबल ट्रस्टला भाडेपट्ट्याने मंजूर शासकीय जमिनीचा भाडेपट्टा पुढील ३० वर्षासाठी नूतनीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. (महसूल विभाग)
काजू, मोहाच्या दारूला विदेशी मद्याचा दर्जा
मुंबईतील मनोरी (ता.बोरीवली) येथील परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रम चॅरिटेबल ट्रस्टला दिलेल्या शासकीय जमिनीच्या भाडेपट्टयाचे पुढील ३० वर्षासाठी नुतनीकरण करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रम चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेस मौजे मनोरी येथील स.नं.२६० मधील ५५ एकर १५ गुंठे शासकीय जमीन, झाडे लावून त्यांची जोपासना करण्यासाठी ४ एप्रिल १९९० पासून ३० वर्षाच्या कालावधीसाठी वार्षिक १ रुपये या नाममात्र भाडेपट्टयाने मंजूर केलेली होती. या जमिनीचा भाडेपट्टा ३ एप्रिल २०२० रोजी संपुष्टात आला होता.
शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे अधिकृत भागभांडवल १०० कोटी रुपये करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ हे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची कोकण विभागाची उपकंपनी आहे. यापूर्वी महामंडळाचे अधिकृत भागभांडवल १५ कोटी रुपये होते. त्यामध्ये भरीव वाढ करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.
पुणे महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्पातील स्वारगेट ते कात्रज या भुयारी रेल्वे प्रकल्पास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प एप्रिल 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पुणे महानगरपालिकेने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (महामेट्रो) मार्फत हा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. यामध्ये महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्पातील स्वारगेट ते कात्रज ही टप्पा-१ ची विस्तारीत मार्गिका भुयारी पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ३ हजार ६६८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Dwalsepatil @bb_thorat @mieknathshinde @VarshaEGaikwad #cabinetdecisions #cabinetmeeting pic.twitter.com/Oer3u565lt
— NCP (@NCPspeaks) April 20, 2022
हेही वाचाः “मटणकरीं’नी जरा सांभाळून…”; संदीप देशपांडेंचा अमोल मिटकरींना धमकीवजा इशारा