घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगर24 जणांच्या मृत्यूनंतरही आणखी 70 रुग्ण अत्यवस्थ; विरोधकांकडून सरकारवर ताशेरे

24 जणांच्या मृत्यूनंतरही आणखी 70 रुग्ण अत्यवस्थ; विरोधकांकडून सरकारवर ताशेरे

Subscribe

काही दिवसांपूर्वीच ठाणे शहराच्या महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती

नांदेड : नांदेडमधील शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी 24 जणांच्या मृत्यूनंतरही याच रुग्णालयात अद्यापही 70 रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती समोर येत असून, या रुग्णांना वाचवण्यासाठी प्राधान्य देण्याची गरज असल्याची मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे. (70 more patients in critical condition after 24 deaths Criticism of the government from the opposition)

काही दिवसांपूर्वीच ठाणे शहराच्या महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेवरून आरोप-प्रत्यारोपाची फैरी झडल्या होत्या. या घटनेची धग शांत झालेली नसताना तोच आता नांदेडमधील शहरातील शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये 12 नवजात बालकांचा समावेश आहे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून, वेळेवर औषधे पुरवठा झाला नसल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप केला जात आहे.

- Advertisement -

अशोक चव्हाणांनी घेतली अधिष्ठातांची भेट

अशोक चव्हाण यांनी अधिष्ठातांकडून माहिती घेतली. यावेळी आणखी 70 रुग्ण हे अत्यवस्थ असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. या रुग्णांना वाचवण्यासाठी प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. या रुग्णालयातील नर्सेसच्या बदल्या झाल्या आहेत. डॉक्टरांची कमतरता आहे. तेव्हा तातडीने सरकारने याची दखल घ्यावी. ज्या कमतरता या रुग्णालयात आहेत, त्याची तातडीने पूर्तता करावी. तसेच घटनेची चौकशी करावी अशी मागणी चव्हाणांनी केली.

हेही वाचा : ई-सिगारेट बाळगणारे आता आरोग्य मंत्रालयाच्या रडारवर; नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई

- Advertisement -

अंधारेंनी केली राजीनाम्याची मागणी

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू होणं धक्कादायक आहे. आरोग्यमंत्री म्हणून
तानाजी सावंत यांची कामगिरी निराशाजनक नाही तर चिंताजनक आहे. आरोग्यदायी महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ सावंतांचा राजीनामा घ्यायला हवा. अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्वीट करून केली आहे.

हेही वाचा : नांदेड हादरलं: 24 तासांत 24 जणांचा मृत्यू; नांदेडच्या शासकीय रुग्णालयात भयंकर प्रकार

जयंत पाटील यांनी व्यक्त केला संताप

नांदेड येथील घटनेवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आपल्या ट्विटमधून आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी प्रकारानंतर नांदेडहून येणारी बातमी वेदनादायी आहे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला. रुग्णांना वेळेवर औषधे पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. जितकी कार्यक्षमता स्वतःच्या प्रचारासाठी, विरोधी पक्ष फोडण्यासाठी वापरता, तितकी कार्यक्षमता जर कामाप्रती दाखवली असती तर ही परिस्थिती आली नसती. सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे आज अनेक आयांनी आपली लेकरे गमावली आहेत. त्यांच्या अश्रूंची किंमत सरकारला मोजावी लागेल असा इशारा त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

 

हसन मुश्रीफ यांनी दिले कारवाईचे आश्वासन

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, की घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई होणार आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, खासगी रुग्णालयात रुग्ण गंभीर झाले की त्यांना सरकारी रुग्णालयात आणले जाते. उद्या मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मी स्वतः नांदेडला जाणार आहे. त्याआधी मी अधिकाऱ्यांना नांदेडला पाठवलं आहे, त्यांच्याकडून आढावा घेतला जाईल. घडलेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती नेमली जाईल. पैशाच्या कारणावरून डिस्चार्ज देणाऱ्या खासगी रुग्णालयांवर चाप लावला जाणार असल्याचाही इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -