घरक्राइमगुजरातमध्ये ७२ तास रंगला अटकेचा थरार, मुंबई गुन्हे शाखेने 'असे' पकडले अनिल...

गुजरातमध्ये ७२ तास रंगला अटकेचा थरार, मुंबई गुन्हे शाखेने ‘असे’ पकडले अनिल जयसिंघानीला

Subscribe

Anil Jaisinghani Arrest |अनिल जयसिंघानीला मलबार हिल पोलिसांकडे आजच सुपुर्द करणार असून त्याच्यासोबत इतर सहकाऱ्यांनाही ताब्यात देणार असल्याची माहिती पोलिसांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

Anil Jaisinghani Arrest | मुंबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी याला मुंबई गुन्हे शाखेने गुजरातहून अटक केली आहे. या अटकेचा थरार मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत विषद केला. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त, गुन्हे लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई गुन्हे शाखेने गुजरातमध्ये ऑपरेशन राबवले. या ऑपरेशनमध्ये अनिल जयसिंघानी याने पोलिसांना जवळपास ७२ तास गुंगारा दिला. अखेर, गुजरात पोलिसांच्या मदतीने मुंबई गुन्हे शाखेने त्याला अटक केली आहे. त्याचा ताबा मलबार हिल पोलीस ठाण्यात आज देण्यात येणार आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून पत्रकार परिषद घेऊन या अटकेची माहिती देण्यात आली.

हेही वाचा – Breaking : अनिल जयसिंघानीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, गुजरातहून ताब्यात

- Advertisement -

गुन्हे शाखेने सहआयुक्त गुन्हे यांच्या नेतृत्त्वाखाली पाच पथके तयार केली होती. सायबर गुन्ह्यांची तीन पथके, सीआयूचे १ पथक आणि गुन्हे शाखा युनिट १० चे १ पथकाचा यात समावेश करण्यात आला होता. अनिल जयसिंघानी गेल्या अनेक वर्षांपासून फरार होता. त्याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात १५ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्या शोधासाठी हे पाचही पथक विविध राज्यात तपासासाठी पाठवण्यात आली होती. या तपासादरम्यान पोलिसांना सुगावा लागला. आरोपी गुजरातमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अनिल जयसिंघानी महाराष्ट्रातून शिर्डी, शिर्डीतून गुजरातच्या बारदोली येथे पोहोचल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे तीन पथक गुजरातमध्ये पाठवण्यात आले. गुन्हे शाखेच्या पथकाने सुरत पोलीस, सुरत ग्रामीण पोलीस, गोध्रा, बरोच, बडोदरा पोलिसांशी समनव्य करून ऑपरेशन गुजरातमध्ये राबवले. हा आरोपी ७२ तास पोलिसांना चकवा देत होता. तो बारदोली येथे कसल्याची माहिती मिळाली म्हणून पोलीस तेथे पोहोचले. पण तो तेथून निसटला. आरोपी नंतर सुरतमध्ये गेला, तिथेही पोलिसांनी सापळा रचला, परंतु, तो तिथूनही पोलिसांच्या हातून निसटला. पोटदारा, भरोच, वडोदरा या मार्गे तो गोध्रा या ठिकाणी पळून जात असताना ७२ तासांच्या थरारानंतर रात्री पावणे बाराच्या सुमारास नाकाबंदी करून गोध्राजवळील कलोल येथे गुजरात पोलिसांच्या मदतीने त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या, असा थरार गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सांगण्यात आला.

आरोपीकडून मोबाईल, इंटरनेटचे वेगवेगळी संसाधाने आणि एक कार जप्त करण्यात आली आहे. आरोपीला इतरही लोक मदत करत होते, त्यांनाही चौकशीकरता ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये जी कार वापरली गेली ती महाराष्ट्रातील आहे.

- Advertisement -

अनिल जयसिंघानी हा लोकेशन लपवण्यामध्ये आणि पोलिसांना गुंगारा देण्यात तरबेज आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेला बरीच आव्हाने आली. मुंबई पोलिस दलाचे अधिकारी, कर्मचारी, गुन्हे शाखेकडील तांत्रिक कौशल्यामुळे त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. पुढील चौकशीसाठी त्याला मलबार हिल पोलिसांकडे आजच सुपुर्द करणार असून त्याच्यासोबत इतर सहकाऱ्यांनाही ताब्यात देणार असल्याची माहिती पोलिसांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -