शिवरायांच्या पुतळा अनावरण सोहळ्यानिमित्त ७७ बैलगाडी मांडव; भव्य मिरवणुकीनेही वेधले लक्ष

कळवण : शुक्रवारी (दि.१०) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचा अनावरण सोहळा कळवण येथे संपन्न होत असून त्यानिमित्ताने दि. ५ मार्चपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन शिवस्मारक समितीच्या वतीने करण्यात आले आहेत. रविवारी (दि.५) हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत ७७ बैलगाडी मिरवणुकीद्वारे शिवतीर्थावर मांडव टाकण्यात आला.
शनिवारी श्री विठ्ठल मंदिरात मांडव बेत (पानसुपारी) कार्यक्रमाचे आयोजन शिवस्मारक समितीच्या वतीने करण्यात आले होते. ५ ते १० मार्च दरम्यान होणार्‍या विविध कार्यक्रमांची माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांनी देऊन तालुक्यातील शिवप्रेमींना आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

रविवारी (दि. ५) सकाळी तालुक्यातील ७७ बैलगाड्यांची मांडव मिरवणूक फुलाबाई चौकातून सुभाषपेठ, गांधी चौक मार्गे भाजी मंडईतून गणेशनगर, एसटी बस स्थानकमार्ग मेनरोडने शिवतीर्थापर्यंत काढण्यात आली. ७७ बैलगाड्यांचे पूजन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, कळवणच्या प्रथम नगराध्यक्षा सुनीता पगार, उपनगराध्यक्षा लता निकम, सोनाली देवरे, सुनीता निकम, वर्षा शिंदे यांच्यासह ७७ महिलांनी केले. शिवतीर्थावर कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार यांनी सपत्निक विधीवत मांडव पूजन केल्यानंतर मांडव टाकण्यात आला. महिलांच्या हस्ते पुतळ्याचे व चबुतर्‍याचे पूजन करण्यात येऊन हजारो शिवप्रेमींच्या साक्षीने शिवरायांची सामूहिक महाआरती करण्यात आली. यावेळी शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी शेकडो मोबाईलच्या कॅमेर्‍यांनी मांडव टाकण्याचे आणि बैलगाडी मांडव मिरवणूक, महाआरतीचे दृश्य टिपले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन योगेश मालपुरे, राकेश हिरे यांनी केले.

विविध कार्यक्रमांची रेलचेल

अनावरण सोहळ्यानिमित्ताने शिवस्मारक समितीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ५ ते ८ मार्च दरम्यान गांधी चौकात रात्री ८ ते १० ह.भ.प. रोहिदास महाराज हांडे यांचा शिवचरित्र संगीत कथा कार्यक्रम, दि. ६ ते ८ मार्च दरम्यान ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चाराने शिवशक्ती याग,१० मार्च रोजी दुपारी २ वाजता शिवशाहीर कार्यक्रम,दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचा मान्यवरांच्या हस्ते पुतळा अनावरण होणार असून सायंकाळी ६ वाजता लेझर लाईट आणि फायर शो होणार आहे. अशी माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांनी दिली.

१० मार्च रोजी होणार अनावरण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वरुढ पुतळ्याचे अनावरण १० मार्च रोजी दुपारी ४ वाजता माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते तर युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, ह.भ.प. संजय धोंडगे, शिवचरित्र व्याख्याते यशवंत गोसावी उपस्थित राहणार आहेत. तरी जिल्ह्यातील शिवप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार नितीन पवार, नगराध्यक्ष कौतिक पगार यांनी केले आहे.