राज्य उत्पादन शुल्क ब विभाग नाशिक पथकाने अवैध मद्यसाठ्याची वाहतूक करणार्या स्कूलबसचालकास शनिवारी (दि.१६) सापळा रचून ताब्यात घेतले. पथकाने ही कारवाई नाशिक-आग्रा महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरील हॉटेल काका-का ढाब्यासमोर, इंदिरानगर येथे केली. पथकाने चालकाच्या ताब्यातून ९६० विदेशी मद्याच्या बाटल्या, स्कूलबस असा एकून ११ लाख ५३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अजिताभ शिरीष सारंग (वय ४९, रा. बजरंग सोसायटी, वडाळा पाथर्डी रोड, इंदिरानगर, नाशिक) असे ताब्यात घेतलेल्या संशयित चालकाचे नाव आहे. (960 liquor bottles seized from school bus)
एक्साईजच्या पथकाने शनिवारी (दि.१६) महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर छापा टाकला. पथकास स्कूलबस (एम. एच. १५ जी. व्ही. ३४१६)मध्ये मॅकडॉवेल नं.१ व्हिस्कीच्या १८० मि.ली. क्षमतेच्या बॅच नं. ८३८/०८-१०-२०२४ नमुद असलेल्या एकूण १० बॉक्समध्ये ४८० सिलबंद बाटल्या, ऑफिसर चॉइस ब्लू व्हिस्कीच्या १८० मि. ली. क्षमतेच्या बॅच नं. १८/१०-१०-२०२४ नमूद असलेल्या १० बॉक्समध्ये ४८० सिलबंद बाटल्या असे एकूण २० विदेशी मद्याचे बॉक्स मिळून आले. याप्रकरणी बसचालक सारंगविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ब विभागाचे निरीक्षक आर. जे. पाटील, दुय्यम निरीक्षक धिरज जाधव, गणपत अहिरराव, प्रविण वाघ, सहायक दुय्यम निरीक्षक विष्णू सानप, जवान अमित गांगुर्डे, संतोष कडलग, दुर्गादास बावस्कर, महेंद्र भोये, रॉकेश पगारे यांनी केली.