राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय, नव्या पेन्शन योजनेत…

eknath shinde

मुंबई – जुन्या पेन्शन योजनेवरून राज्य सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याकरता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार, नव्या पेन्शन योजनेत सुधारणा करण्यात येणार आहे. त्यानुसार कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू योगदान देण्याचा मंजूर करण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी राज्यातील जवळपास १८ लाख कर्मचारी संपावर गेले आहेत. यामुळे राज्यातील शासकीय कामकाज विस्कळीत झाले आहे. आरोग्यव्यवस्था कोलमडली असून शैक्षणिक क्षेत्रातील कर्मचारी संपावर गेल्याने शाळांना टाळा लागले आहेत. तर, दुसरीकडे विविध शासकीय कामेही रखडली आहे. यामुळे सामान्य नागरिकांना याचा फटका बसला आहे. सरकार जुनी पेन्शन योजना लागू करत नाही तोवर संप मिटवणार नसल्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

दरम्यान, जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरता समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर जुन्या पेन्शन योजनेनंतर निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली होती. त्यानंतरही संपकऱ्यांनी संप मागे न घेतल्याने अनेक जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आज मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. या बैठकीत जुनी पेन्शन लागू करण्यापेक्षा नवीन पेन्शनमध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयाबाबत विधानसभेत लवकरच माहिती देण्याची शक्यता आहे.