आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही.., शिंदेंनी ट्विट केलेल्या पत्रानंतर अयोध्येबाबत मोठा खुलासा

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना भावनिक आवाहन करत मी राजीनामा द्यायला तयार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. तसेच त्यांनी वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडून मातोश्रीत रहायचा निर्णय घेतला आहे. परंतु मुख्यमंत्र्यांच्या भावनिक भाषणाला आमदार शिरसाट यांनी पत्रातून आमदारांची भावना प्रकट केली आहे. परंतु शिंदेंनी ट्विट केलेल्या पत्रानंतर अयोध्येबाबत मोठा खुलासा समोर आला आहे.

आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका…

कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांचा १५ जून रोजी अयोध्या दौरा होता. यावेळी आदित्य ठाकरे यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्येत भेट दिली. त्यानंतर अयोध्येत त्यांनी रामलल्लांचं दर्शन घेतलं होतं आणि शरयू नदीच्या तीरावर त्यांनी महापूजा देखील केली होती. यावेळेस शिवसेनेच खासदार संजय राऊत, एकनाथ शिंदे यांच्यासह काहीच नेत्यांनी हजेरी लावली होती. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे शिरसाट यांनी लिहिलेल्या पत्रातून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावेळी आमदार विमानात बसणार इतक्यात उद्धव ठाकरेंनी शिंदेंना फोन केला आणि आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका, असं सांगितलं.

सीएम साहेबांचा फोन अन्…

हिंदुत्व, अयोध्या, राममंदीर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना? मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेंव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं ? तुम्ही स्वत: फोन करुन अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका असे सांगितले. मुंबई विमानतळावरून अयोध्येला निघालेल्या मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांचे लगेज चेक इन झाले होते, आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही शिंदे साहेबांना फोन करून सांगितले की आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका आणि जे गेलेत त्यांना तुम्ही स्वतः परत घेऊन या. शिंदे साहेबांनी आम्हाला लगेच सांगितले की सीएम साहेबांचा फोन आला होता आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका. आम्ही मुंबई विमानतळावर चेक इन केलेले लगेज परत घेतले आणि आपले घर गाठले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नव्हते मग विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवला? आम्हाला रामलल्लांचं दर्शन का घेऊ दिले नाही?

आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का?

मतदारसंघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायचे आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय असा निरोप बडव्यांकडून यायचा पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो. तीन ते चार लाख मतदारांमधून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का हा आमचा सवाल आहे ?


हेही वाचा : वर्षा बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद, पण… शिंदेंकरवी शिरसाटांचं थेट उद्धव ठाकरेंना