घरमहाराष्ट्रगर्वाचे घर खाली, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया

गर्वाचे घर खाली, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई : गेल्यावर्षी जूनमध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर ऑक्टोबरमध्ये ठाकरे आणि शिंदे गटातील निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या नावाचा वाद शिगेला पोहोचला होता. पण आज, शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने कौल दिला. यावरून त्यांच्या गर्वाचे घर खाली झाले असल्याची प्रतिक्रिया भाजपा आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा निर्णय म्हणजे खोक्यांचा विजय आहे. या निर्णयामुळे नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास उडाला आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. खोक्यांचा वारेमाप वापर करुन महाराष्ट्रात सत्ताबदल झाला आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय अपेक्षित होता. हा निर्णय दबावाखाली देण्यात आला आहे. देशातील सर्व स्वायत्त संस्थांना गुलाम करण्याचे हे तंत्र आहे. आता आम्ही नवीन चिन्ह व नाव घेऊन जनतेसमोर जाऊ, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

तर, हा बहुमताचा विजय, सत्याचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या विचारांचा हा विजय आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी आणि आम्ही घेतलेला जो निर्णय आहे, त्या विचारांबरोबर एकरुप झालेल्या आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच हजारो-लाखो सैनिकांचा हा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisement -

शिंदे गटासोबत असलेल्या भाजपाने देखील या निर्णयाचे स्वागत करताना, ठाकरे गटावर टीका केली आहे. ‘ज्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी फारकत घेतली, हिंदुत्वाला सोडचिठ्ठी दिली, प्रभू रामाची पण खिल्ली उडवली, आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कारण नसताना टीका केली, भाजपावर नाहक आगपाखड केली. त्यांच्या गर्वाचे घर खाली झाले’ असल्याची टीका भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

अखेर न्याय झाला, सत्याचा विजय झाला. एकनाथ शिंदे यांच्या हातात शिवसेना गेली आणि मराठी माणसाची शिवसेना वाचली. आज खऱ्या अर्थाने वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला चिरशांती मिळाली, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -