मातोश्री कनेक्शन असलेले आयुक्त रमेश पवारांना पालिकेत ब्रेक?

ठाकरे सरकारने केलेल्या बदल्या शिंदे सरकारने थांबवल्या

ठाकरे सरकारच्या काळात झालेल्या बड्या अधिकर्‍यांच्या बदल्यांना शिंदे सरकारने ब्रेक लावण्याचा धडाका सुरू केला असतानाच महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मर्जीतील अधिकार्‍यांच्या बदल्या करण्याचेही नियोजन शिंदे सरकारने केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्यासंदर्भात एक यादीच तयार करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे बदल्यांच्या या यादीत महापालिका आयुक्त रमेश पवार यांच्याही नावाचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. पवार यांची नियुक्ती थेट मातोश्रीवरून किंबहुना तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या शिफारशीनुसार झाल्याने त्यांच्या बदलीसाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत.

सरकार बदलल्यावर अधिकार्‍यांच्या बदल्या होणे ही बाब नवीन नसली तरी एकनाथ शिंदे यांच्या निर्णयांचा धडाका बघता महाविकास आघाडीची डोकेदुखी यामुळे वाढत आहे. शिंदे यांनी नव्याने घेतलेल्या निर्णयानुसार ठाकरे सरकारच्या काळात झालेल्या बड्या अधिकार्‍यांच्या बदल्यांना रोखण्यात येणार आहेत. यात आयएएस दर्जाच्या अधिकार्‍यांचा समावेश आहे. त्यात आस्तिक पांडे, दीपा मुधोळ-मुंडे, अभिजित चौधरी यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे. या बदल्या ठाकरे सरकारकडून २९ जूनला झाल्या होत्या. औरंगाबाद महापालिका आयुक्त पांडे यांची औरंगाबाद सिडकोत करण्यात आली होती.

सांगली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची बदली औरंगाबाद पालिका आयुक्त म्हणून केली होती. तर, सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी दीपा मुधोळ-मुंडे यांची केलेली नियुक्ती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दूरध्वनीव्दारे स्थगित केली. त्यानंतर आता ठाकरे सरकारच्या मर्जीतील अधिकार्‍यांच्या बदल्या करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर या बदल्या केल्या जातील, असे बोलले जाते.

आम्ही सांगतो पाणी कुठे मुरते
नाशिक महापालिकेत रुजू झालेले तत्कालीन आयुक्त कैलास जाधव हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असल्याची चर्चा होती. एकनाथ शिंदे यांच्या शिफारशीवरुनच जाधव यांची नाशिक आयुक्तपदी वर्णी लागली होती. असे असतानाही दीडच वर्षात म्हणजे दिवाळीच्या काळात महाविकास आघाडीतील नेत्यांच्या आग्रहास्तव जाधव यांची बदली करण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, ही कथित बदली रोखण्यात एकनाथ शिंदे यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर मार्च महिन्यात म्हाडाच्या घरांचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे सरकारने जाधव यांची तडकाफडकी बदली केली. जाधव यांच्या जागी मुंबई महापालिकेत त्यावेळी सहआयुक्त असलेले रमेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली. यात आदित्य ठाकरे यांनी मोठी भूमिका बजावल्याचे बोलले गेले. ही बदली करताना तत्कालीन पालकमंत्री म्हणून छगन भुजबळ यांचाही ‘से’ अर्थातच संमती घेतली गेली नाही. महत्वाचे म्हणजे पवार हे मुंबई महापालिकेत सहआयुक्त होते. त्यांचे केडरही याच महापालिकेचे आहे. नाशिक महापालिकेचे आयुक्तपदावर सचिव वा काहीवेळा अवनत करून सहसचिव दर्जावरील अधिकार्‍यांची नियुक्ती झाली आहे. मात्र, प्रथमच एखाद्या अन्य महापालिकेतील अधिकार्‍याची या पदावर नियुक्ती झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. रमेश पवार यांचे केवळ आदित्य ठाकरे यांच्या बरोबरच नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्याबरोबरही निकटचे संबंध होते. त्यांचे थेट ‘मातोश्री’ कनेक्शन शिंदे गटाला हादरा देणारे होते. मात्र, सत्ता पालटताच आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मर्जीतील अधिकार्‍याची नियुक्ती संबंधित विभागांमध्ये वा महापालिकांत करण्याचा मनोदय व्यक्त केल्याचे समजते. त्यासाठी एक यादीही तयार करण्यात आल्याचे सांगितले जाते. यात नाशिक पालिका आयुक्त रमेश पवार यांचाही समावेश असल्याचे कळते. त्यांच्या जागेवर पुन्हा कैलास जाधव यांची नियुक्ती होते की अन्य अधिकार्‍याची वर्णी लागते हे बघणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.