भंडाऱ्यात भर पावसात बस आणि ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. भंडाऱ्यात भर पावसात बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. त्यामुळे दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळच्या दरम्यान भंडारा साकोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ मोहघाट जंगल परिसरामध्ये घडली. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक देखील खोळंबली आहे.

रायपूर येथून निघालेली हंसा ट्रॅव्हल्स नागपूरच्या दिशेने जात असताना एका उभ्या असलेल्या ट्रकला भीषण धडक दिली. ही धडकेत ट्रॅव्हल्सचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. ट्रॅव्हल्समधील जखमी प्रवाशांना साकोली येथील सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. ट्रॅव्हल्समध्ये जखमी झालेल्या रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

भंडारा जिल्ह्यात कालपासून अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. २४ तासांत तब्बल ९५.८ मिमी इतका पाऊस झाला आहे. गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने या प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे बुधवारी एक मीटरने उघडण्यात आले. तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरातील २५ घरांमध्ये पाणी शिरले. तसेच भंडारा ते तुमसर राज्यमार्ग आणि भंडारा ते बालाघाट महामार्ग ठप्प झाला आहे.


हेही वाचा : पावनखिंडवर दारू पिऊन धिंगाणा, शिवभक्तांनी दिला चोप; व्हिडीओ व्हायरल