बुलढाण्यात मध्यरात्री 25 प्रवाशांसह बस नदीत कोसळली; एका महिलेचा मृत्यू

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आहे. शेगावरून पुण्याच्या दिशेने जाणारी खासगी ट्रॅव्हल्स बस नदीत पडल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे, तर 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. याशिवाय 17 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. (Buldhana Accident)

शेगावरुन पुण्याच्या दिशेने जाणारी खासगी ट्रॅव्हल्स बस बुलढाणामधील पैनगंगा नदीत पडली आहे. चिखली तालुक्यातील पेठ परिसरात भरधाव बस आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस पैनगंगा नदीच्या पुलावरून तब्बल १५ फूट खोल दरीत पडली आहे. या बसमधून अंदाजे 25 ते 30 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर येत असून या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे, तर 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे आणि 17 जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे.

या अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. जखमी प्रवाशाना बसच्या बाहेर काढून त्यांना चिखली येथील ग्रामीण रुग्णाल्यात दाखल करण्यात आले. हा भीषण अपघात बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातानंतर जखमी झालेले प्रवासी मदतीसाठी टाहो फोडला होता. जखमी प्रवाशांचा आक्रोश ऐकून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्यास सुरूवात केली. मात्र, रात्रीच्या अंधारामुळे मदतकार्यास अडथळे येत होते.

मध्यप्रदेशातही बस 50 फुट खाली कोसळी
मध्यप्रदेशातील खारगोन जिल्ह्यातील बोराड नदीवरील पुलावरून प्रवाशांनी भरलेली बस 50 फूट खाली पडून मोठा अपघात मंगळवारी (9 मे) घडला होता. मां शारदा ट्रॅव्हल्सची बस क्रमांक MP10-P-7755 ही बस खारगोन जिल्ह्यातून इंदूरच्या दिशेने जात असताना खारगोन-ठीकरी मार्गावरील दसंगा गावाजवळ हा अपघात झाला. बस नदीवरील पुलावरून तब्बल 50 फुट खाली अचानक पडली असून या बसमध्ये 40 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. बस पडल्यानंतर मोठा आवाज झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती देत बचाव कार्यात मदत केली. त्यांनी सांगितले की, या मार्गावरून बसेस दररोज भरधाव वेगाने जातात. अनेकवेळा आम्ही बसचालकांना अडवले असता त्यांनी दादागिरी केली आहे. बोराड नदी कोरडी असल्यामुळे आतापर्यंत मृतांची संख्या 15 झाली आहे.