पीडित महिलेच्या तक्रारीवरून श्रीकांत देशमुखांवर पुण्यात गुन्हा दाखल

सोलापूरचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. बेडरूममधील एका व्हायरल व्हिडिओमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. एका महिलेने अत्याचार करून तिची फसवणूक केल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून श्रीकांत देशमुख यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेने काल रात्री उशीरा पुण्यातील डेक्कन पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या तक्रारीत पीडित महिलेने असं म्हटलंय की, श्रीकांत देशमुख यांच्यासोबत तिची शिक्षण घेत असल्यापासून ओळख होती. त्यानंतर ही महिला पुढे मुंबई शहर भाजप युवतीसेनेची जनरल सेक्रेटरी बनली. तेव्हा ही ओळख वाढत गेली. तसेच श्रीकांत देशमुख यांनी मला लग्नाचं आश्वासन दिलं. सोलापूरमधील गेस्ट हाऊस, पुण्यातील डेक्कन आणि मुंबईतील खेतवाडी भागातील हॉटेल यांसारख्या अनेक हॉटेलमध्ये देशमुखांनी तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिला फसवण्यात आलं आणि लग्नाची मागणी केल्यानंतर तिला धमकावलं, अशा स्वरूपाची तक्रार या पीडित महिलेने दाखल केली आहे.

काही दिवसांपूर्वी देशमुखांचा एका महिलेसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये तिने देशमुख यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता. यानंतर देशमुख यांनी आपल्या भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. हे प्रकरण विवाहबाह्य संबंधांच्या अवतीभवती असल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून आले.

दरम्यान, देशमुखांवर पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सोलापूरला वर्ग करण्यात आला आहे. कलम ७६, ७७, ५०४, ५०६ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


हेही वाचा : माझं ‘तेच’ हिंदुत्व, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला