पुण्यात ठाकरे आणि शिंदे समर्थकांमध्ये तुफान राडा, नेमकं काय घडलं?

पुण्यात ठाकरे आणि शिंदे समर्थकांमध्ये तुफान राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. हा सर्व प्रकार पुण्यातील गांजवे चौकातील पत्रकार संघासमोर घडला. एका विशेष कार्यक्रमासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आले असता हा राडा झाल्याचं सांगितलं जात आहे.

दोन्ही गटाचे कार्यकर्ते एका विशेष कार्यक्रमासाठी पुण्यातील गांजवे चौकातील पत्रकार संघासमोर आले होते. त्यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. परंतु कार्यक्रम संपल्यानंतर शिंदे समर्थक बाहेर आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. या घोषणाबाजीनंतर ठाकरे समर्थक आक्रमक झाले. त्यानंतर त्यांनीही घोषणाबाजी करण्या सुरुवात केली. या कारणामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

दोन्ही गटाच्या पुरुष कार्यकर्त्यांसोबत महिला कार्यकर्ताही आपापसात भिडल्या. यातच परिस्थिती निवळत नसल्याचं पाहत अखेर पोलिसांना मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या मार्गावर थांबवलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांची समजूत काढली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

दापोलीत शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून दोन्ही गट आमने-सामने

काल शुक्रवारी दापोलीत शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे आणि ठाकरेंचे समर्थक आमने-सामने आले होते. आमदार योगेश कदम समर्थकांनी उद्धव ठाकरे गटाच्या शाखेत घुसून जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला होता. त्यामुळे दापोलीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु यावेळी पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. नंतर पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली होती.


हेही वाचा : महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने कसली कंबर, आजपासून अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर