सर्वांनाच लागू होणारे लोकसंख्येचे सर्वसमावेशक धोरण हवे, सरसंघचालकांचे प्रतिपादन

नागपूर : देशात लोकसंख्येचे योग्य संतुलन आवश्यक आहे. आपल्या देशाचे पर्यावरण किती लोकांना पालनपोषण शकते, किती लोकांना ते सांभाळू शकते, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. हा केवळ देशाचा प्रश्न नाही. जन्म देणाऱ्या आईचाही प्रश्न आहे. त्यामुळे लोकसंख्येचे सर्वसमावेशक धोरण असावे आणि ते सर्वांनाच लागू व्हावे. त्या धोरणातून कोणालाही सवलत देता कामा नये, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी केले. यावेळी पद्मश्री संतोष यादव या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संघाच्या मुख्यालयात झाला. संघाच्या दसरा उत्सवात प्रथमच महिला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती. दोनदा एव्हरेस्ट सर करणाऱ्या संतोष यादव या एकमेव महिला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले. एखाद्या देशात जेव्हा लोकसंख्येचा असमतोल निर्माण होतो, तेव्हा त्या देशाच्या भौगोलिक सीमाही बदलतात. एका भूभागातील लोकसंख्येचा समतोल बिघडल्यानेच इंडोनेशियापासून पूर्व तिमोर, सुदान ते दक्षिण सुदान आणि सर्बिया ते कोसोवा असे नवे देश निर्माण झाले. लोकसंख्या नियंत्रणाबरोबरच पंथावर आधारित लोकसंख्येचा समतोल राखणे हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे मोहन भागवत म्हणाले.

शक्ती हीच शुभ आणि शांतीचा आधार आहे. आपण महिलांना जगतजननी मानतो, पण त्यांना पूजाघरात बंदिस्त करतो. मातृशक्तीबद्दल जागृतीचे कार्य आपल्या कुटुंबातूनच सुरू करावे लागेल, असे सांगून ते म्हणाले, महिलांशिवाय विकास शक्य नाही. मातृशक्ती जे करू शकते ते पुरुषही करू शकत नाहीत. त्यामुळे अशाप्रकारे त्यांचे प्रबोधन, सक्षमीकरण करून त्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य देणे तसेच कामांमध्ये समान स्वरुपात सहभागी करणे आवश्यक आहे.

आज आत्मनिर्भर भारताची प्रतिमा उभी राहात आहे. भारताचे म्हणणे जग आता ऐकत आहे. जगात आपली पत आणि प्रतिष्ठा वाढली आहे. आम्ही श्रीलंकेला मदत केली, रुसो-युक्रेन युद्धादरम्यान आम्ही जी भूमिका मांडली, ते हे दर्शवते की आमचे ऐकले जात आहे, असे तेही त्यांनी सांगितले.

‘संघाचे कार्य जाणून घ्या’
माझे वागणे-बोलणे पाहून अनेकदा लोक मला विचारायची की तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत आहात का? पण त्यावर मी विचारायची की, ते काय असते? मला त्यावेळी संघाबद्दल माहिती नव्हती. पण आता मी जगातील समस्त मानव जमातीला विनंती करते की, त्यांनी येथे यावे आणि संघाचे कार्य जाणून घ्यावे. हे अतिशय उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहे, असे महिला गिर्यारोहक संतोष यादव यांनी यावेळी सांगितले.