टाटा मेमोरियल रुग्णालयाला सिप्झकडून 1.21 कोटी रुपयांची देणगी

मुंबई : सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट प्रोसेस झोनने (सिप्झ) आपल्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त टाटा मेमोरियल हॉस्पिटलला 1.21 कोटी रुपयांची देणगी देऊन सहृदयता आणि दानशूरपणाचा परिचय दिला आहे.

सिप्झच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या समारंभाची सुरुवात 1 ऑक्टोबरपासून, तीन दिवसांच्या रक्तदान शिबिराने करण्यात आली. संस्थेच्या रक्तदान शिबिरात 5000 लोकांनी रक्तदानासाठी नोंदणी केली. त्यापैकी 2000 लोकांनी पहिल्याच दिवशी रक्तदानही केले. आपल्या या सत्कार्याची फारशी प्रसिद्धी व्हावी, असा सिप्झचा मानस नव्हता. मात्र, तरीही या सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिणामी टाटा रुग्णालयात रक्तदात्यांची अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी झाली. अशा वेळी सिप्झ युनिटच्या स्वयंसेवकांनी टाटा व्यवस्थापन अधिकाऱ्यांनाही व्यवस्थापनात मदत केली. या रक्तदान मोहिमेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद बघता, भविष्यात एक मॅरेथॉन घेण्याचाही सिप्झचा विचार आहे.

क्षेत्रीय विकास अधिकारी श्याम जगन्नाथन यांनी मंचावरील मान्यवर पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘पद्मश्री’ एच के ग्रुपचे अध्यक्ष सावजीभाई धनजीभाई ढोलकिया, सन्माननीय अतिथी म्हणून माजी पोलीस महासंचालक आणि रोटी बँकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डी शिवानंदन, एसजीजेएमएचे अध्यक्ष राजीव शंकर पंड्या, एच के डिझाईनचे व्यवस्थापकीय संचालक घन:श्याम ढोलकिया आणि क्रिएशन ज्वेलरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सेझ प्राधिकरणाचे सदस्य आदिल कोतवाल उपस्थित होते.

याप्रसंगी मान्यवरांना स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता गांधीजींच्या “वैष्णव जन ते…” या भजनाने झाली. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यासारखा पेहराव केलेल्या काही स्वयंसेवकांनी हे भजन सादर केले. सी पी सिंह चौहान यांनी आभार प्रदर्शन केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘संस्कृती के रंग, सिप्झ के संग और कॅन्सर से जंग’ हा संगीतमय कार्यक्रम उत्सवाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आला आहे.