कोणताही पुरावा नसताना अवघ्या ४८ तासांत दुहेरी खूनाचा उलगडा करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. गुप्तधनाचा साठा असल्याचे सांगून पाच जणांनी संगनमताने दोन जणांचा साल्हेर किल्ल्यावर काठी, कुर्हाड व दगडाने निर्घृण खून केला. विशेष म्हणजे, पाच जणांनी दुहेरी खून गुप्तधनासाठी न करता जमिनीच्या वादातून केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
रामभाऊ गोटीराम वाघ (वय ६०, रा. गोपाळखडी, ता. कळवण), नरेश रंगनाथ पवार (६३, रा. कळवण, जि.नाशिक) अशी मृत वृद्धांची नावे आहेत. विश्वास दामु देशमुख (वय ३६, रा. केळझर, ता. सटाणा, जि. नाशिक), तानाजी आनंदा पवार (३६, रा. खालप, ता. देवळा, जि. नाशिक), ३) शरद ऊर्फ बारकू दुगाजी गांगुर्डे (३०, रा. बागडु, ता. कळवण, जि. नाशिक), सोमनाथ गोटीराम वाघ (५०, दोघेही रा. गोपाळथडी, ता. कळवण, जि.नाशिक), गोपीनाथ सोमनाथ वाघ (२८) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
जायखेडा पोलीस ठाणे हद्दीत साल्हेर किल्ल्याच्या डोंगरावर २२ नोव्हेंबर रोजी अनोळखी दोन व्यक्तींचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले होते. मयत युवकांनी परिधान केलेले कपडे व अंगावरील वस्तूंवरून त्यांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. दोघेही वयोवृद्ध पुरुष असल्याचे समोर आले. अनोळखी आरोपींनी अज्ञात कारणावरून रामभाऊ वाघ व नरेश पवार यांच्या डोके, चेहरा व मानेवर वर्मी घाव करून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांचे मृतदेह निर्जनस्थळी डोंगरावर टाकून दिले होते. याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात रामभाऊ वाघ व नरेश पवार हे बेपत्ता असल्याची नोंद अंभोणा पोलीस ठाण्यात झाल्याचे समोर आले. स्थानिक गुन्हे शाखाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी मृत व्यक्तींबाबत सविस्तर माहिती घेतली. त्यातून खूनाचा उलगडा झाला.
असे सापडले आरोपी
पोलीस चौकशीत रामभाऊ वाघ व नरेश पवार हे १३ नोव्हेंबर रोजी दुचाकीवरून कळवण परिसरातून सटाण्याच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. त्यावरून तपासाची चक्रे फिरवून स्थानिक गुन्हे शाखा व जायखेडा पोलीस पथकाने दोन दिवस साल्हेर किल्ला व केळझर धरण परिसरात पाळत ठेवून संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली.
असा केला पाच जणांनी खून
संशयित सोमनाथ वाघ व मयत रामभाऊ गोटीराम वाघ यांच्यामध्ये जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद होता. मयत रामभाऊ वाघ यास त्याचा मित्र नरेश रंगनाथ पवार हा जमिनीच्या वादात कळवण कोर्टात मदत करीत होता. या रागातून संशयित सोमनाथ वाघ याने चौघांना बोलवून घेतले. त्यानंतर सोमनाथ वाघ याने गुप्तधनाचा साठा असल्याचे सांगून रामभाऊ वाघ व नरेश पवार यांना साल्हेर किल्ल्यावर बोलवून घेतले. या ठिकाणी पाच जणांनी संगनमताने रामभाऊ वाघ व नरेश पवार यांना काठी, कुर्हाड व दगडाने मारहाण करून निर्घृण खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह निर्जनस्थळी साल्हेर पठारावर फेकून दिले. त्यानंतर मयताच्या दुचाकीची विल्हेवाट लावली.