मुंबई-: मुंबई ते कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत पसरलेल्या संपूर्ण कोकण पट्ट्यातील समस्त नाथपंथी गोसावी समाजाच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी विविध संस्थांनी एकत्र येऊन ‘कोकण विभाग नाथपंथी गोसावी महासंघ’ स्थापन केला आहे. या कोकण विभाग नाथपंथी गोसावी महासंघाचा पहिला कौटुंबिक स्नेहमेळावा 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत समाज मंदिर हॉल, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व) येथे महासंघाचे अध्यक्ष गणेश परशुराम गोसावी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. (A family gathering of the Nathpanthi Gosavi community in Konkan)
या महासंघाच्या माध्यमातून आरक्षणाअंतर्गत होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा देणे, नाथपंथी गोसावी समाजाच्या मुलामुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविणे व त्यांची आर्थिक उन्नती करणे, विवाहाची समस्या सोडविण्यासाठी वधू – वर परिचय मेळावे आयोजित करणे, आपल्या पारंपरिक विधींचे जतन करणे, समाजातील जेष्ठ समाज बांधवांचे मार्गदर्शन शिबीर भरविणे, नाथपंथी गोसावी समाज भवन उभारणे इत्यादी उद्दिष्ट्ये साध्य करण्यात येणार आहेत.
या महामेळाव्यामध्ये महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, वधूवर परिचय कार्यक्रम , समाजातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, वरिष्ठ पदावरील अधिकारी, डॉक्टर, वकील, इंजिनियर, दूरदर्शन मालिकांमधून यशस्वी झालेल्या व समाजाचा नावलौकिक वाढवलेल्या तसेच राज्य व जिल्हा स्तरावरील स्पर्धेत विजेतेपद प्राप्त मुलामुलींच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
या महामेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून गाथा नवनाथांची या लोकप्रिय दूरदर्शन मालिकेचे निर्माते व दिग्दर्शक संतोष आयाचित तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय दूरदर्शन मालिकेचे निर्माते सचिन गोस्वामी हे उपस्थित राहणार आहेत.
या कौटुंबिक स्नेहमेळाव्यासाठी कोकणातील समस्त नाथपंथी गोसावी बंधू भगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन कोकण विभाग नाथपंथी गोसावी महासंघाचे अध्यक्ष गणेश प. गोसावी यांनी केले आहे.
(हेही वाचा: वरिष्ठांचे दुर्लक्ष! तळे येथील ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांचे राजीनामे )