इंदिरानगर : वडाळा गावं परिसरातील सेंट सादिक शाळा परिसरात रात्रीच्या सुमारास सुमारे सात ते आठ तरस आढळून आले. त्यामुळे नागरिकांमधे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या सुमारास नागरिकांनी घराबाहेर जाणे बंद केले आहे. (A flock of otters was found in Nashik; Citizens stopped going out at night)
वडाळा गाव परिसरातील सेंट सादिक शाळा परिसराजवळ मोठ्या प्रमाणावर अनधिकृत गोठे बांधण्यात आले असून, हजारोच्या संख्येत येथे गायी व म्हशी आहेत. मृत वासरू, पारडू, गाई व म्हशी या परिसरात उघड्यावरच फेकून दिल्या जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मृत जनावरांना खाण्यासाठी तरसांचा कळप दररोज रात्री येत आहेत. परिणामी, नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर जाणे बंद केले आहे.
काही दिवसांपूर्वी येथील एका नागरिकावर तरसांच्या कळपाने हल्ला केला. त्यात ते नागरिक जखमी झाले होते. याप्रकरणी वनविभागाने तरसांचा बंदोबस्त करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तरस लष्करी हद्दीतील जंगलात दिवसभर लपून बसतात. रात्रीच्या वेळी ते बाहेर निघत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अनेक महिन्यांपासून वडाळा परिसरात तरसांचा मुक्त संचार आहे. रात्रीच्या सुमारास जीव मुठीत धरून बाहेर पडावे लागत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने पुढाकार घ्यावा.
हाजी फिरोज शहा, स्थानिक रहिवासी
वडाळा गाव परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत गोठे बांधण्यात आले आहेत. पशूपालक मृत जनावरे सार्वजनिक ठिकाणी फेकून देत आहेत. त्यामुळे तरसांचा वावर वाढला आहे. याप्रकरणी संबंधित विभागांनी कठोर कारवाई करावी.
रमीझ पठाण, सामाजिक कार्यकर्ते