PM and CM Metro Travel |मुंबई – मुंबईतील विविध विकासकामांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलखुलास गप्पाही मारल्या. व्यासपीठावर दोघांमधील संवाद अनेकांनी पाहिला. तसंच, मेट्रो प्रवासातही दोघे एकमेकांच्या बाजूला बसले होते. तेव्हाही एकमेकांसोबत ते दिलखुलास हसताना दिसले. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यामुळे नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना सर्वांना हसू फुटले असेल असा प्रश्न अनेकांना पडला. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खुलासा केला आहे. त्यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत येण्याचं मान्य केलं. त्यामुळे, त्यांना याबाबत जाहीर धन्यवाद दिले आहेत. मुंबईतील विकासाला कालपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मोदींच्या शुभहस्ते ही सुरुवात झाली. मेट्रो सुरू झाली, कॉन्क्रिटचे रस्ते सुरू होतील, सुशोभीकरणाची कामे सुरू झाली, आपला दवाखाना सुरू झाला. मुंबईकरांच्या हितासाठी आम्ही निर्णय घेतले होते. मुंबईबाबत मोदींना आपुलकी आहे. मुंबईच्या महाराष्ट्राच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही, असंही त्यांनी मान्य केलं आहे. या आनंदाच्या क्षणी मी मांडलेल्या मुद्द्यांना मोदींनी दिलखुलास दाद दिली. हा त्यांचा मोठेपणा आहे.”
Guess the conversation.. 😄 pic.twitter.com/xaQh7RHbQE
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 19, 2023
अनेक पदाधिकारी शिवसेनेत दाखल झाले आहेत. सरकार स्थापन झाल्यापासून अनेक पक्षातील पदाधिकारी दररोज सरकारवर पक्षावर विश्वास ठेवून शिवसेनेत सामील होत आहेत. सरकारबाबत विश्वास निर्माण झाला आहे की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. म्हणून ज्या ज्या ग्रामपंचायतीमधून सरपंच निवडून आले असे सरपंच आपल्या पक्षात येत आहेत. त्यांच्या ग्रामपंचायत हद्दीत सोयीसुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. गावाच्या विकासाची सुरुवात आपल्या सरकारकडून होत आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज म्हणाले.
मी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या मंत्र्यांनी सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक मोठे निर्णय घेतले. संभाजी महाराजांची जंयती साजरी करण्याचाही निर्णय घेतला आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या निर्णयाचं स्वागत होत आहे, असंही शिंदेंनी सांगितलं.