धारावी येथील झोपडपट्टीत भीषण आग; ६ झोपड्या जळून खाक

Sessions court sends notice to Rana couple
Sessions court sends notice to Rana couple

धारावी येथील झोपडपट्टीत रविवारी रात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत ६ झोपड्या जाळून खाक झाल्या आहेत. मात्र सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झालेले नसून आग काही अवधीतच विझविण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.

प्राप्त माहितीनुसार, धारावी, सायन वांद्रे लिंक रोड, श्रीराम बिल्डिंग, सुमित्रा हॉटेल नजीक, मुकुंद नगर येथील झोपडपट्टीत रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीबाबत माहिती मिळताच नागरिकांनी सदर परिसरात गर्दी केली. काही स्थानिकांनी सुरुवातीला आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, स्थानिकांनी आगीची वर्दी देताच पालिका यंत्रणा, पोलीस, बेस्ट यंत्रणा व अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अग्निशमन दलाने ३ फायर इंजिन व ३ जंबो वॉटर टँकर यांच्या साहाय्याने सदर आगीवर काही अवधीतच नियंत्रण मिळविला.

मात्र तोपर्यंत ६ झोपड्या जाळून खाक झाल्या. या झोपड्यातील रहिवाशांना आता आजची रात्र कुटुंबियांसह रस्त्यावरच काढावी लागणार असल्याचे समजते. अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर आगीवर अथक प्रयत्नांनी नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र ही आग का व कशी काय लागली, याबाबत स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाचे अधिकारी चौकशी करीत आहेत.


हेही वाचा : Platform Ticket : मुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ; उद्यापासून नवीन दर लागू होणार