एक नेता, एक झेंडा, एक मैदान…; शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित

shivsena

मुंबई – शिवसेनेकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. शिवाजी पार्कात तब्बल दोन वर्षांनी दसरा मेळावा होणार आहे. तसंच, यंदा राजकीय उलथापालथ झाल्याने यावर्षीच्या शिवाजी पार्कावरील दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा टिझर आज प्रदर्शित झाला आहे. यामध्ये बाळासाहेबांचा फोटो दिसत असून शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा, असं आवाहन करण्यात आलंय.

हेही वाचा -दादरमध्ये लागणार स्क्रीन, उभारणार मोठाले गेट; दसरा मेळाव्याकरिता ठाकरेंकडून जय्यत तयारी

उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तर, एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसीच्या मैदानावर होणार आहे. या दोन्ही दसरा मेळाव्याला राजकीय प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. हे दोन्ही मेळावे यशस्वी होण्याकरता दोन्ही गटाकडून जोरदार ताकद पणाला लावली जात आहे. दरम्यान, शिवसेनेने दसरा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित केला आहे. या टीझरमधून शिवसैनिकांना भावनिक साद घालण्यात आली आहे.’निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार, महाराष्ट्राची ताकद दिसणार,’ असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या आवाजात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो अशी साद घालण्यात आली आहे. तसंच, या ऐतिसाहिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा असं आवाहनही टीझरच्या माध्यमातून करण्यात आले आहे.


उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला तब्बल दीड लाखांपर्यंत शिवसैनिकांची गर्दी जमण्याची शक्यता आहे. विविध जिल्ह्यांतून येणाऱ्या शिवसैनिकांना शिवतीर्थावर पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांवर सोपवण्यात आलीय. तसंच, मुंबईतील शिवसेनेच्या शाखाप्रमुखांकडून शिवसैनिकांचं स्वागत करण्याची जबाबदारी दिली आहे. तसंच, दादर, माहिम, प्रभादेवी परिसरात शिवसैनिकांच्या स्वागतासाठी विशेष गट उभारण्यात येणार आहेत. स्वागतासाठी राम गणेश गडकरी चौक, राजा बढे चौक, सावरकर मार्ग, सिद्धीविनायक मार्ग इथे गेट उभारले जाणार आहेत.

दादर परिसरात मोठाले स्क्रीन

दसरा मेळाव्यातील भाषणात सर्वांचं लक्ष असतं. शिवाजी पार्कात प्रचंड गर्दी असते. त्यामुळे अनेकांना पार्कात प्रवेश मिळत नाही. अशा कार्यकर्त्यांना भाषण ऐकता यावं याकरता दादर आणि आजूबाजूच्या परिसरात स्क्रीन लावण्यात येणार आहेत.

एकनाथ शिंदेंनेही प्रदर्शित केला टीझर

शिंदे गटाकडून बीकेसीमध्ये दसरा मेळावा घेण्यात येणार आहे. यासाठी शिंदे गटाने काल टीझर प्रदर्शित केला. या टीझरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आवाज वापरण्यात आला असून शिवसेनेचा दसरा मेळावा असा उल्लेख करण्यात आलाय. या टीझरच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारुढ मूर्ती दाखवण्यात आली असून बाळासाहेबांची मूर्ती आणि शेवटी एकनाथ शिंदेंची प्रतिमा दाखवण्यात आली आहे. शिवरायांचा भगवा झेंडा, शिवसेनेचे भगवा झेंडा, हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत, सतत आणि आणि सातत्याने आस्मानात फडकत राहिला पाहिजे, हे बाळासाहेबांचं वाक्य टाकण्यात आलं आहे.