पहिली परीक्षा पास; आता लक्ष सोमवारच्या फायनलकडे!

Eknath Shinde

मुंबई : गेले काही दिवस सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा शेवटचा अंक उद्या, सोमवारी होणार आहे. आज, रविवारी विधानसभा अध्यक्षपदासाठी झालेली निवडणूक शिंदे सरकारने आरामात जिंकली. त्यामुळे आता सोमवारी होणाऱ्या बहुमत चाचणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकार स्थापन केल्यावर लगेचच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार रविवार आणि सोमवार असे दोन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. पहिल्या दिवशी राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे राहुल नार्वेकर आणि शिवसेनेचे राजन साळवी आमने-सामने होते. राहुल नार्वेकर हे 164 मते मिळवून विजयी झाले. तर, राजन साळवी यांना 107 मते मिळाली. मनसेचे आमदार राजू पाटील तसेच बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्यासह तीन आमदारांनी राहुल नार्वेकर यांना मतदान केले. तर, समाजवादी पक्षाचे दोन आणि एमआयएमचा एक आमदार तटस्थ राहिला. राष्ट्रवादीच्या सात आमदारांसह एकूण 12 आमदार अनुपस्थित होते.

हेही वाचा – पुढची 30 ते 40 वर्ष भाजपचीच, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शहांचे वक्तव्य

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीची परीक्षा शिंदे सरकार उत्तीर्ण झाले असून आता सर्वांचे लक्ष आहे ते उद्याच्या (सोमवार) फायनलकडे. राज्यापालांच्या आदेशानुसार सोमवारी शिंदे सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जायचे आहे. रविवारची आकडेवारी ध्यानी घेता शिवसेना-भाजपा युती सरकारकडे 164 आमदारांचे पाठबळ आहे. शिवाय, आजारपणामुळे आजच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी न झालेले भाजपाचे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या दोघांचीही मते शिंदे सरकारच्या पारड्यातच राहतील.

व्हिप झुगारल्याची दोन्हीकडून तक्रार
महाविकास आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करण्याचा व्हिप शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी बजावला होता. तर, शिंदे गटात शिवसेनेचे 39 आमदार असून भरत गोगावले हे या गटाचे प्रतोद आहेत. त्यांनी देखील भाजपाच्या राहुल नार्वेकर यांना मतदान करण्याचा व्हिप बजावला होता.

एकनाथ शिंदे समर्थक आमदारांनी शिवसेनेचा व्हिप मोडला हे रेकॉर्डवर यावे यासाठी सुनील प्रभू यांनी दिलेल्या पत्राच्या आधारे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मतदानाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग रेकॉर्डवर घेण्याचे आदेश दिले. तर, प्रतोद भरत गोगावले यांनी देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलेले पत्र रेकॉर्डवर घेण्यात आले आहे.

हेही वाचा – एअर इंडिगोची देशभरात तब्बल 900 उड्डाणे उशिरा, DGCAने मागितला खुलासा