घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रबैलजोडीची तब्बल ३.५१ लाखाला विक्री

बैलजोडीची तब्बल ३.५१ लाखाला विक्री

Subscribe

नामपूर कृउबा समिती बैल बाजारातील विक्रम

सटाणा : आधुनिक शेती करत असताना आधुनिक तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात अवगत असतानाही पारंपरिक शेती करण्यासाठी व काळ्या आईची इमानाने सेवा करण्यासाठी सर्जा-राजाला आजही अनन्य साधारण महत्व असल्याचे बुधवारी (दि.१७) दिसून आले. बागलाण तालुक्यातील नामपूर येथील प्रसिद्ध बैल बाजारात तब्बल ३ लाख ५१ हजार रुपये किंमतीला बैलजोडी विकली गेली.

सारंगखेड येथे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोड्यांचा बाजार श्री दत्त जयंतीला भरत असतो. तर तालुक्यातील नामपूरला दर बुधवारी अव्वल दर्जाचा बैल बाजार भरत असतो. परंतु येथे श्रावण महिन्यात पोळा सणाच्या आधी भरणारा बैल बाजारात मोठ्या प्रमाणात बैलांची खरेदी विक्री होऊन मोठी उलाढाल होत असते. या बैल बाजारात लांबलांबून शेतकरी बैल खरेदी करण्यासाठी येत असतात.

- Advertisement -

बुधवारी (दि.१७) भरलेल्या नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील आवारात बैल खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग सहभागी झाले होते. मालेगाव तालुक्यातील गाळणे येथील शेतकरी भास्कर सोनवणे यांनी आपल्या सर्जा- राजाची बोली लावली असता खरेदीदार बाळू विष्णू बागूल (रा.पाडगण, ता. कळवण) यांनी सुमारे ३ लाख ५१ हजार रुपये किंमत देत ही बैलजोडी खरेदी केली. बैल जोडीच्या खरेदीनंतर गुलालाची उधळण करत व ढोल-ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. एवढ्या मोठ्या किंमतीला बैलजोडी विक्री झाल्याने परिसरात चर्चा सुरू होती.

छबी टिपण्यासाठी मोठी झुंबड

बाजार समितीच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा विक्रम आहे. तब्बल ३ लाख ५१ हजार रुपयांना खरेदी झालेली बैलजोडी पाहण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत बघ्यांची गर्दी उसळली होती. एवढेच नाही तर हि विक्रमी दराने खरेदी झालेल्या बैल जोडीची छबी आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी झुंबड उडाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -