घरताज्या घडामोडीमंत्र्यांच्या मागे फिरणार्‍यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान

मंत्र्यांच्या मागे फिरणार्‍यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान

Subscribe

मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे काँग्रेसच्या नाराज गटाने मांडले गार्‍हाणे

ज्यांनी कधी पक्षाच्या आंदोलनात सहभाग घेतला नाही, पक्षीय कामकाजाचा अनुभव नाही, केवळ मंत्र्यांच्या मागे पुढे फिरणार्‍यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान देण्यात आले असून आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणूकांमध्ये या नियुक्तीचा फायदा होण्याऐवजी तोटाच अधिक होणार असल्याचे सांगत काँग्रेसच्या नाराज गटाने महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे गार्‍हाणे मांडले. याबाबत येत्या दोन चार दिवसांत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे बैठक आयोजित करण्याचे आश्वासन ठाकूर यांनी पदाधिकार्‍यांना दिले.

नाशिक शहर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रदेश समितीतील पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्यांमुळे तीव्र नाराजी पसरली आहे. या नियुक्त्यांवरून काँग्रेस अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. याबाबत दखल घेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाशिक दौर्‍यावर असलेल्या मंत्री यशोमती ठाकूर यांना या नाराजांच्या भावना जाणून घेण्याबाबत सांगितले. त्यानूसार शासकीय विश्रामगृह येथे या सर्व पदाधिकार्‍यांना पाचारण करण्यात आले होते. या बैठकीत पदाधिकार्‍यांनी नवनियुक्त पदाधिकार्‍यांच्याविरोधात तक्रारींचा पाढाच वाचला. प्रदेशवर नियुक्ती करतांना स्थानिकांशी निदान चर्चा करून, विश्वासात घेऊन नियुक्त्या करणे आवश्यक होते. ज्यांनी कधी पक्षात सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम केलेले नाही. इतकेच काय स्वतःकडे चार दोन कार्यकर्ते नाही, काहींना निवडणूकांचा अनुभव नाही. जिल्हयाचे राजकारण, नागरी प्रश्नांची जाण नाही अशा व्यक्तींना प्रदेशवर स्थान देण्यात आल्याने पदाधिकार्‍यानी नाराजी व्यक्त केली. केवळ मंत्र्यांच्या मागे पुढे करणार्‍यांना प्रदेशवर स्थान दिले जाते का ? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

- Advertisement -

सर्व पदाधिकार्‍यांची नाराजी ऐकून घेत त्यांना नाराज न होता पक्षाच्या कामात सक्रीय राहण्याच्या सूचना ठाकूर यांनी दिल्या. तक्रारींबाबत आपण स्वतःपाठपुरावा करून प्रदेशाध्यक्षांना कळवले जाईल तसेच लवकरच मुंबईत प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते राजेंद्र बागुल, उल्हास सातभाई, महाराष्ट्र काँग्रेस काँग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष विजय राऊत, प्रदेश अनुसूचित सेलचे सुरेश मारू, माजी नगरसेवक रईस शेख, सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकुर, प्रदेशचे माजी पदाधिकारी भारत टाकेकर, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष हनिफ बशीर, अनुसूचित सेलचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे , युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील पाटील,मध्य नाशिक ब्लॉकचे अध्यक्ष बबलू खैरे, नाशिकरोड ब्लॉकचे अध्यक्ष दिनेश निकाळे, सिडको ब्लॉकचे अध्यक्ष विजय पाटील,पंचवटी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष उद्धव पवार,सातपूर ब्लॉकचे अध्यक्ष कैलास कडलग, माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे, युवक काँगेसचे माजी अध्यक्ष व माजी प्रदेश पदाधिकारी संदीप शर्मा, भरत पाटील युवक काँग्रेसचे जावेद पठाण,अभिजित राऊत, सचिन दिक्षित, सिध्दार्थ गांगुर्डे आदी उपस्थित होते.

संपर्कमंत्रीच आऊट ऑफ रेंज
सर्व तक्रारी ऐकून घेतल्यानंतर याबाबत आपण आपल्या संपर्क मंत्र्यांशी चर्चा केली असा सवाल यशोमती ठाकूर यांनी केला. मात्र संपर्कमंत्री बाळासाहेब थोरात कधी संपर्कातच नसतात अशी तक्रारवजा नाराजीही यावेळी व्यक्त करण्यात आली. पदाधिकार्‍यांचे हे उत्तर ऐकून ठाकूरही अवाक झाल्या. परंतु याबाबत पक्षश्रेष्ठींच्या कानावर आपली नाराजी निश्चिपणे कळवली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -